करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. रुग्णालयात बेड्स नाहीत, ऑक्सिजन नाही अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना प्राणाला मुकावं लागत आहे. तसेच करोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर करोना लसींच्या किंमतींवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. करोनाची लस मोफत मिळाली पाहीजे असं ट्विट त्यांनी केलं आहे.

“चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे. बस एवढंच..भारताला भाजपाच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका”, असं टीकास्त्र त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून सोडलं आहे.

यापूर्वीही राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. सिस्टम फेल झाल्याप्रकरणी जनहिताची चर्चा करणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

“हे आम्हाला आवडलं नाही,” मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २० एप्रिलला करोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी करोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.