काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चक्क एका महोत्सवात सहभागी होत नाच केला आहे. त्यांचा नाचाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. छत्तीसगड येथील रायपूरमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाच केला. या नाचात खास प्रकारची टोपी घालून ते सहभागी झाले होते. हाती ढोलासारखे असलेले पारंपरिक वाद्यही त्यांनी घेतले. त्यांच्या या खास नाचाचा व्हिडीओ ट्विटरवरही व्हायरल होतो आहे.

राहुल गांधी हे CAA, NCR या मुद्द्यांवरुन मोदी सरकारविरोधात आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले होते. या कायद्यावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकाही केली होती.  मात्र आदिवासी महोत्सवात ते जेव्हा उपस्थित झाले तेव्हा त्यांच्या स्वभावातला हा विशेष गुण पाहण्यास मिळाला. आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक नृत्य करत राहुल गांधींनी त्यांच्यासह ठेका धरला.