सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांच्या मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्यावर कोर्टाने ही कारवाई केल्यानंतर संसदेने त्यांची खासदारकी रद्द केली. यानंतर काँग्रेस आक्रमक झालं आहे. संकल्प सत्याग्रहही सुरू केला आहे. देशात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येतं आहे. अशा सगळ्यात राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्वीटर बायोमध्ये मोठा बदल केला आहे. ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीटर बायोमध्ये काय बदल केला आहे?
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्या ट्वीटर बायोमध्ये बदल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटर बायोमध्ये Disqualified MP म्हणजे अपात्र लोकसभा खासदार असं लिहिलं आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. तसंच या बदललेल्या ट्वीटर बायोची चर्चाही सोशल मीडियावर चांगलीच होते आहे.
राहुल गांधी यांचं संसदेचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. तसंच राहुल गांधी यांनी सदस्यत्व रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली. तसंच मोदी मला घाबरले आहेत. त्यामुळेच माझ्यावर कारवाई झाली आहे.
पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले की अदाणीच्या मुद्द्यावर मी भाषण केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत. मी ही भीती त्यांच्या डोळ्यात पाहिली आहे. त्यामुळे असे मुद्दे बाहेर काढून माझ्याविरोधात कारवाई करण्यात आली. त्यानंतर माझं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. मी संसदेत गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विमानात बसलेला फोटो दाखवला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हापासून मोदी आणि अदाणी यांचे सलोख्याचे संबंध आहेत. सध्या जे काही होतं आहे तो लोकशाहीवरचा हल्ला आहे. संसदेत भाजपाचे मंत्री माझ्याविरोधात खोटं बोलले. मी विदेशात जाऊन त्यांच्याकडे मदत मागितली हे पूर्णपणे खोटं आहे तरीही ते सोयीस्कर पद्धतीने पसरवण्यात आलं असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.