यंदा भाजपकडून ४०० पारची घोषणा करण्यात आली होती. मात्र आजचे निकाल बघता संपूर्ण भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही ३०० जागांच्या आत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमताचा टप्पा ओलांडला असला तरी पंतप्रधान मोदी यांनी भाजपला ३०० पार नेण्याची घोषणा केली होती. मात्र ती पूर्ण होताना दिसत नाहीये. उलट विरोधकांच्या इंडिया आघाडीने यंदाच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. इंडिया आघाडीने २०० वर जागा मिळवल्या आहेत. मात्र बहुमताचा आकडा तिला गाठता आलेला नाही. आता सरकार कोण स्थापन करेल हे येणारा काळच सांगेल. दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी इंडिया आघाडीच्या घवघवीत यशावर आनंद व्यक्त केला. तसेच भाजपवर जोरदार टीका केली.

लोकसभेचा निकाल खूप चांगला लागला. जे लोक चारशेचा दावा करत होते त्या दाव्याची हवा निघाली. भाजपला बहुमत मिळाले नाही. त्यांना सरकारस्थापनेचा नैतिक अधिकार नाही. हे यश प्रतिकूल परिस्थितीत मिळाले आहे. विरोधी पक्षांना ज्याप्रमाणे त्रास देण्यात आला, ते बघता हे मोठे यश असल्याचे राजीव शुक्ला एएनआयशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024 : भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक विजय, नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधींचा रायबरेलीतून विजय

सध्या देशात इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी २९० जागांवर आघाडीवर आहे. थोड्या वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. आता रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचाही विजय झालेला आहे. राहुल गांधी यांचा रायबरेली मतदारसंघातून तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा तब्बल २ लाख जास्त मताधिक्य राहुल गांधी यांना मिळाले आहेत.

हेही वाचा – आंध्र प्रदेशात टीडीपी अन् भाजपाला बहुमत, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी दिला राजीनामा

मोदींच्या मताधिक्यात घट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवघ्या दीड लाखांच्या फरकाने विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा दीड लाख मतांनी पराभव केला. नरेंद्र मोदी आणि अजय राय यांच्यात शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, काही फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेत अजय राय यांचा पराभव केला. मागच्या वेळी मोदींना मिळालेल्या निवडणुकीच्या विजयाची तुलना केली असता यावेळी पंतप्रधान मोदी यांचं मताधिक्य घटलं आहे.