काँग्रेस नेते शशी थरूर त्यांच्या इंग्रजी शब्दांमुळे कायमच चर्चेत असतात. त्यांनी वापरलेले इंग्रजी शब्द भल्याभल्यांचा डोक्यावरून जातात. असाच एक शब्द शशी थरूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये वापरला आहे. हा शब्द वाचताना नेटकऱ्यांची बोबडी वळाली आहे. इंग्रजी शब्दाचा उच्चार काही केल्या नेटकऱ्यांना जमेना, त्यामुळे त्या ट्वीटखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.

शशी थरूर यांनी ‘floccinaucinihilipilification’ हा इंग्रजी शब्द लिहिला आहे. हा शब्द देवनागरीत लिहूनही ‘फ्लॉकीनॉकिनीहिलिपिलिफिकेशन’ वाचता येत नाही एवढा लांबलचक शब्द आहे. या शब्दाचा अर्थ तरी काय असावा असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तेलंगाणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव यांच्यासोबत मैत्रिपूर्ण चर्चा करताना त्यांनी या शब्दाचा वापर केला. केटी रामा राव यांनी करोनावरी काही औषधांची यादी ट्विटरवर शेअर केली आहे. ती नावं उच्चारणं कठीण असल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी शशी थरून यांना टॅग करत यात ‘या शब्दांमागे शशी थरून यांचा हात असावा असं दिसतंय’ असं लिहीलं आहे.

या ट्वीटला शशी थरूर यांनी त्यांच्या अंदाजात उत्तर दिलं आहे. नुसतं उत्तर दिलं नाही तर एकच शब्द लिहीला आणि नेटकऱ्यांना बुचकळ्यात पाडलं.

ऑक्सफोर्ड शब्दकोशात या शब्दाचा अर्थ ‘व्यर्थ गोष्टींबाबत विचार करण्याची सवय’ असा आहे. त्यामुळे नक्की या शब्दाचा उच्चार कसा असावा यासाठी नेटकऱ्यांची झुबंड उडाली आहे.