Sonia Gandhi Admitted in Hospital: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्री उशिरा त्यांना या रुग्णालयात आणलं गेलं. डॉक्टरांचं एक पथक सोनिया गांधींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. याआधी दोन महिन्यांपूर्वीही अशाच पद्धतीने सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. सोनिया गांधींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार वातावरणात झालेल्या बदलांमुळे त्यांना हा त्रास झाला आहे. सध्या डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

सोनिया गांधींची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

प्राथमिक माहितीनुसार, सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मंगळवारी रात्री १ च्या नंतर सोनिया गांधी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना छातीत त्रास जाणवू लागला आणि अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. अनुप बसू यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही पोहचले रुग्णालयात

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समजताच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी हे दोघंही तातडीने सर गंगाराम रुग्णालयात पोहोचले. प्रियंका गांधी सध्या आई सोनिया गांधींसह रुग्णालयातच उपस्थित आहेत. त्या सध्या रुग्णालयातच असून डॉक्टरांकडून वेळोवेळी प्रकृतीचा आढावा घेत आहेत. तूर्तास त्यांची प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात आलं आहे.

जानेवारी महिन्यातही सोनिया गांधी होत्या रुग्णालयात

जानेवारी २०२६ मध्येही सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांना छातीत संसर्ग झाला होता आणि श्वसनाच्या त्रासामुळे सहा दिवस रुग्णालयात रहावं लागलं होतं. थंडीमुळे आणि प्रदूषणामुळे सोनिया गांधी यांचा दमा बळावला होता. त्यापूर्वी जून २०२५ पोटाच्या विकारांमुळे त्यांना चार दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते प्रार्थना करत आहेत. अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाकडून अधिकृत हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही. लवकरच हेल्थ बुलेटिन जाहीर होण्याची शक्यता आहे. मेडिकल बुलेटीन जाहीर झाल्यानंतर पुढची माहिती कळणार आहे.