गेल्या २० वर्षात पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी गांधी परिवारातील कोणीही या निवडणुकीत सहभागी होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. मात्र, वरवर पाहता असे होताना दिसत नाही. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांका गांधी वाड्रा या निवडणुकीत रस घेताना दिसून येत आहेत.

हेही वाचा – Vande Bharat Express : आज देशाला मिळणार तिसरी ‘वंदे भारत ट्रेन’, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सलग दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदी गांधी परिवारातील कोणीही असणार नाही, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, या निवडणुकीत प्रियांका गांधी वाड्रा यांच्या यांची भूमिका काय असेल, याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विचारले असता, ते म्हणाले, ”प्रियंका गांधी यांनी २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत. काँग्रेस अध्यक्ष पदाची निवड करताना, उमेदवार योग्य आहे की नाही, यावर त्या लक्ष ठेऊन आहेत.”

हेही वाचा – गर्भपात हा महिलेचा अधिकारच; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; विवाहित-अविवाहित भेद घटनाबाह्य़

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांची नावे आघाडीवर होती. मात्र, राज्यस्थानमधील राजकीय संकटानंतर गेहलोत यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रियंका गांधी यांना राज्यस्थानमध्ये सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करायचे होते. मात्र, आमदारांच्या नाराजीमुळे ते शक्य झाले नाही. दोन वर्षांपूर्वीही सचिन पायलट यांच्या बंडानंतर प्रियंका गांधी यांच्या मध्यस्थीनेच हे बंड रोखण्यात काँग्रेसला यश आले होते.