काँग्रेसप्रणीत युपीएचे अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी काँग्रेसला डिवचले. भाजपा आणि काँग्रेस अशी थेट लढत होणाऱ्या राज्यांमध्ये भाजपाचा प्रभाव वाढत असल्याचं म्हणत त्यांनी भाजपाविस्ताराचे खापर काँग्रेसवर फोडले. तसेच भाजपाला समर्थ पर्याय निर्माण करण्याची गरज बोलून दाखवली. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींना यूपीए म्हणजे काय हे माहित नाही का? असा सवाल करत त्यांच्यावर टीका केली. या संपूर्ण आरोप प्रत्यारोपांवर रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया देत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

“काँग्रेस ज्या विचार आणि आणि जागेचे प्रतिनिधित्व करते ते मजबूत विरोधी पक्षासाठी आवश्यक आहे. परंतु काँग्रेसचे नेतृत्व हा एखाद्या व्यक्तीचा दैवी अधिकार नाही. विशेषत: अशा परिस्थितीत जेव्हा पक्ष गेल्या १० वर्षांत ९०% पेक्षा जास्त निवडणुका हरला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे नेतृत्व लोकशाही पद्धतीने ठरवू द्या,” अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी ट्विट करून राहुल गांधींना लक्ष्य केलंय.

किशोर यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता टीका केली आहे. गेल्या १० वर्षांत काँग्रेसची धुरा ही आधी पडद्यामागे नंतर अध्यक्ष होत राहुल गांधी यांनी सांभाळली होती. मात्र २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसला ५० च्या आसपास जागा मिळाल्या. एवढंच नाही तर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला अपयशाचा सामना करावा लागला. तर काही राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेसला संख्याबळाच्या खेळामुळे सत्ता गमवावी लागली. एवढंच नाही तर पक्ष म्हणून भाजपाचा आकार वाढत असतांना काँग्रेस बॅकफूटवर गेलेले पहायला मिळाले. त्यामुळेच काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रशांत किशोर यांनी सडकून टीका केली आहे

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या…

काँग्रेसप्रणीत युपीएचे अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी काँग्रेसला डिवचले. त्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असता त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. भाजपा आणि काँग्रेस अशी थेट लढत होणाऱ्या राज्यांमध्ये भाजपाचा प्रभाव वाढत असल्याचं म्हणत त्यांनी भाजपाविस्ताराचे खापर काँग्रेसवर फोडले. तसेच भाजपाला समर्थ पर्याय निर्माण करण्याची गरज बोलून दाखवली.

अधीर रंजन चौधरींचं प्रत्युत्तर..

“ममता बॅनर्जींना यूपीए म्हणजे काय हे माहित नाही का? मला वाटते की त्यांनी वेडेपणा सुरू केला आहे. त्यांना वाटतंय की पूर्ण भारत ‘ममता, ममता’ म्हणू लागला आहे. परंतु भारत म्हणजे बंगाल नाही आणि बंगाल म्हणजे भारत नाही. पश्चिम बंगालमधील मागच्या निवडणुकांमध्ये त्यांनी वापरलेली युक्ती आता हळूहळू उघड होत आहेत,” असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.