नवी दिल्ली : विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत बुधवारी लोकसभेत काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या खासदारांनी लोकसभाध्यक्षांच्या समोरील हौदात उतरून निदर्शने केली.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि ‘द्रमुक’चे सदस्य सभागृहाच्या मोकळय़ा जागेत येऊन उभे राहिले. ‘ईडी-मोदी डाऊन डाऊन’ व ‘नरेंद्र मोदी जवाब दो’ अशा घोषणा देत गोंधळ घातला. राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेसचे खासदारही घोषणाबाजीत सहभागी झाले; पण हे खासदार आपापल्या जागेवरूनच काँग्रेसच्या निदर्शनांना पाठिंबा देत होते. विरोधी पक्षांचा गदारोळ न थांबल्याने सभागृह पहिल्या दहा मिनिटांमध्ये १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. नंतर पुन्हा सव्वा बारा  वाजता दुपारी २ वाजेपर्यंत सभागृह तहकूब झाले. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास व शून्य प्रहर होऊ शकला नाही.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस खासदारांनी, गटनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात हा मुद्दा मांडण्याची परवानगी द्यावी, असा आग्रह धरला. पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी अधीर रंजन यांना बोलण्याची परवानगी न दिल्याने काँग्रेसच्या खासदारांनी घोषणाबाजी पुन्हा सुरू केली. या गदारोळात, ‘द्रमुक’चे खासदार दयानिधी मारन हे काँग्रेसच्या शशी थरूर आणि कार्ती चिदम्बरम आदी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना लोकसभाध्यक्षांच्या समोरील हौदात येण्याची विनंती केली. हे पाहून सोनिया गांधी उठून स्वत:च हौदात गेल्या आणि विरोधी खासदारांच्या घोषणाबाजीत सामील झाल्या. त्यांनी कार्ती चिदम्बरम वगैरे आपल्या पक्षाच्या खासदारांनाही सहभागी होण्यास सांगितले.

पैशाच्या अफरातफरीच्या कथित प्रकरणावरून काँग्रेसचे मुखपत्र ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राच्या आवारात टाकण्यात आलेले छापे, विरोध नेत्यांची ‘ईडी’ चौकशी आदी मुद्दय़ांवरून दुपारच्या सत्रातही लोकसभेत गदारोळ होत राहिला. त्यामुळे सभागृह ४ वाजेपर्यंत तहकूब झाले. लोकसभेत केंद्रीय विद्यापीठ (दुरुस्ती) विधेयकावरील चर्चा सुरू असताना विरोधी खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

राज्यसभेत पुन्हा ‘ईडी’चा मुद्दा

काँग्रेस आणि शिवसेनेने बुधवारी राज्यसभेतही केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, पण सभापती व्यंकय्या नायडू यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला. विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, दिपेंद्रसिंह हुडा, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, ‘आप’चे संजय सिंह आणि राघव चड्ढा यांनी अनुच्छेद २६७ अंतर्गत नोटिसा दिल्या होत्या व तातडीने चर्चेची मागणी केली होती.

यंग इंडियन’चे कार्यालय सील, काँग्रेस मुख्यालयाबाहेर बंदोबस्त

दिल्लीतील काँग्रेसच्या मालकीच्या हेराल्ड हाऊसवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, बुधवारी ईडीने हेराल्ड हाऊसमधील यंग इंडियनचे कार्यालय सील केले. या ठिकाणी ईडीच्या परवानगीशिवाय कोणालाही जाता येणार नाही, असेही ईडीने स्पष्ट केले. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जनपथ मार्गावरील निवासस्थानाभोवतीही सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली. विशेष म्हणजे अखिल भारतीय काँग्रेसच्या अकबर रोडवरील मुख्यालयाबाहेरही पोलीस तैनात करण्यात आले तसेच त्या दिशेने येणारे रस्ते बंद करण्यात आले होते.