केंद्र सरकारच्या निर्णयावरून वादंगाची चिन्हे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील इंडिया गेटवरील ‘अमर जवान ज्योत’ शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकातील शाश्वत तेवणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आल्याने वाद उद््भवण्याची चिन्हे आहेत. काही माजी लष्करी अधिकाऱ्यांसह काँग्रेसने केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेसतर्फे अमर जवान ज्योत पुन्हा इंडिया गेटवर प्रज्ज्वलित करण्यात येईल, असा निर्धार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत स्वातंत्र्यानंतर झालेल्या विविध युद्धांमध्ये आणि संघर्षांमध्ये देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता आणि आदरांजलीचे प्रतीक होती. अमर जवान ज्योतीच्या विलीनीकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर तोफ डागली. सरकारने अमर जवान ज्योत विझवून इतिहास पुसून टाकला, असा आरोप काँग्रेसने केला. काही लोक देशभक्ती आणि जवानांचे बलिदान समजू शकत नाहीत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. काँग्रेस पुन्हा एकदा अमर जवान ज्योत प्रज्ज्वलित करील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

काही माजी सेनाधिकाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माजी लष्करप्रमुख जनरल वेद मलिक यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले, तर माजी हवाई दल उपप्रमुख मनमोहन बहादूर यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटर संदेशाद्वारे हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.

एका लहानशा समारंभात शुक्रवारी दुपारी अमर जवान ज्योतीला हलवून तिचे विलीनीकरण इंडिया गेटपासून ४०० मीटरवर असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये करण्यात आले. एकात्मिक संरक्षण दलांचे प्रमुख एअर मार्शल बी. आर. कृष्णा हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन करण्यात आल्याने नागरिक तेथे आदरांजली अर्पण करू शकतात, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले होते. तेथे २५,९४२ जवानांची नावे सुवर्णाक्षरात कोरण्यात आलेली आहेत.

अमर जवान ज्योतीला राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन करण्याच्या निर्णयाबद्दल माजी लष्करी अधिकाऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माजी लष्करप्रमुख जनरल वेद मलिक यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थापन झाले आहे. शहीद जवानांचे स्मरण आणि सन्मानाशी संबंधित सर्व समारंभ तेथे आयोजित केले जातात, त्यामुळे अमर जवान ज्योत तेथे विलीन करणे स्वाभाविक आहे.

माजी हवाईदल उपप्रमुख मनमोहन बहादूर यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटर संदेशाद्वारे हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. ‘‘साहेब, इंडिया गेटवरील चिरंतन ज्योत ही भारताच्या आत्म्याचा एक भाग आहे. तुम्ही, मी आणि आमची पिढी तेथे आमच्या शूर जवानांना मानवंदना देत वाढलो,’’ असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारक महान आहे, परंतु अमर जवान ज्योतीच्या आठवणी अमिट आहेत, अशा भावनाही बहादूर यांनी व्यक्त केल्या आहेत.

अमर जवान ज्योतीच्या विलीनीकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर तोफ डागली. सरकारने अमर जवान ज्योत विझवून राष्ट्रीय युद्ध स्मारकातील चिरंतन ज्योतीमध्ये ती विलीन केली आणि इतिहास पुसून टाकला, असा आरोप काँग्रेसने केला. काही लोक देशभक्ती आणि जवानांचे बलिदान समजू शकत नाहीत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी केली. 

राष्ट्रीय युद्ध स्मारकातील श्रद्धांजलीच खरी : सरकार

या प्रकरणी चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे. अमर जवान ज्योत विझवण्यात आलेली नाही, तर ती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली आहे. सर्व युद्धांतील सर्व भारतीय शहिदांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरण्यात आली आहेत. त्यामुळे तेथे शहिदांना श्रद्धांजली वाहणे हीच खरी श्रद्धांजली आहे, असे समर्थनही सरकारतर्फे अधिकाऱ्यांनी केले.

बलिदानाचे प्रतीक

भारताने १९७१च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर, ‘अमर जवान ज्योत’ हे भारतीय जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मारक म्हणून उभारले गेले होते. २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले होते.

अत्यंत दु:खाची बाब : राहुल गांधी

अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन करून भाजप सरकारने इतिहास पुसून टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला. आमच्या शूर जवानांचे स्मरण करणारी अमर जवान ज्योत आज विझली, ही अत्यंत दु:खाची बाब आहे. काही लोक देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाहीत, पण हरकत नाही, काँग्रेस पुन्हा एकदा ‘अमर जवान ज्योत’ प्रज्ज्वलित करील, असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

सरकारी अधिकारी काय म्हणाले?

अमर जवान ज्योत हे १९७१ आणि इतर युद्धांतील शहिदांच्या आदरांजलीचे प्रतीक आहे, परंतु त्यांची नावे तेथे कोरलेली नसणे ही विचित्र गोष्ट आहे. इंडिया गेटवर कोरलेली नावे केवळ अशा काही जवानांची आहेत ज्यांनी पहिले महायुद्ध आणि अँग्लो अफगाण युद्धात ब्रिटिशांच्या बाजूने बलिदान केले. त्यामुळे ते देशावरील वसाहतवादी भूतकाळाचे प्रतीक आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. भाजप नेते संबित पात्रा यांनीही ट्वीटमध्ये सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress merger of immortal jawan jyoti decisions of the central government akp
First published on: 22-01-2022 at 01:23 IST