बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि अज्ञात धर्मांधांनी केलेली तोडफोड या घटनांमुळे भारतातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेमध्ये ४ जण ठार झाले असून अनेक जखमी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये धार्मिक कट्टरतावाद वाढू लागल्याची टीका होऊ लगली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठी नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

मिलिंद देवरा यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बांगलादेशमध्ये वाढणारी सांप्रदायिक हिंसा अत्यंत चिंताजनक आहे. धार्मिक छळापासून पळून जाणाऱ्या बांगलादेशी हिंदूंचे संरक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी CAA मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. भारतीय मुस्लिमांना बांगलादेशी इस्लामवाद्यांशी बरोबरी करण्याचा कोणताही सांप्रदायिक प्रयत्न भारताने नाकारला पाहिजे.”

दरम्यान, भाजपाने देखील बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात आहे, असं म्हटलंय. “बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात असून इथे सीएए या मानवतावादी कायद्याचे महत्त्व पुन्हा दर्शवत आहे. सीएएला ममता बॅनर्जींचा विरोध आणि आता बांगलादेश हिंसाचाराचवर त्यांचं मौन याची पश्‍चिम बंगालमध्ये राहणाऱ्या हिंदूंना चिंता वाटली पाहिजे. ज्यांना तृणमुल सरकारमुळे अनेक समस्या आणि उपेक्षाला सामोरे जावे लागत आहे,” असे भाजपा प्रवक्ते अमित मालवीय म्हणाले.

बांगलादेशमध्ये हिंदूंची घरे पेटवली..

बांगलादेशात गेल्या आठवड्यात दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदू मंदिरांचा विध्वंस करण्यात आल्याच्या घटनांविरुद्ध अल्पसंख्याक हिंदूंची निदर्शने सुरू असतानाच; समाजमाध्यमावरील एका कथित ईश्वरनिंदात्मक पोस्टच्या मुद्यावर जमावाने बांगलादेशातील हिंदूंच्या ६६ घरांचे नुकसान केले असून, किमान २० घरे पेटवून दिली आहेत. शंभरहून अधिक लोकांच्या जमावाने जाळपोळ करण्याची ही घटना रंगपूर जिल्ह्याच्या पीरगंज उपजिल्ह्यातील एका खेड्यात रविवारी उशिरा घडली. या प्रकरणी ५२ संशयितांना अटक करण्यात आली आहे.