कर्नाटकामध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट ओढवण्याची शक्यता आहे. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे 20 आमदार सरकारवर नाराज असल्याचे म्हटले आहे. नाराज आमदार कोणत्याही क्षणी आपला निर्णय घेऊ शकतात, असंही ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे नाराज आमदार काय भूमिका घेतील, याकडे आमचे लक्ष असल्याचे येडियुरप्पा म्हणाले. कर्नाटकाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने कुमारस्वामी यांना पाठिंबा देत मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 104 तर काँग्रेसला 80 आणि जदयूला 37 जागा मिळाल्या होत्या.
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने जदयूला पाठिंबा देत सरकार स्थापन केले होते. त्यापूर्वी राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिले होते. परंतु बहुमताचा आकडा गाठता न आल्याने येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता.

यानंतर भाजप फोडाफोडीचे राजकारण करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. अनेकदा काँग्रेसने भाजपवर सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करत असल्याचे आरोप केले होते. तर धमकी आणि पैसे देऊनही भाजप काँग्रेसच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही म्हटले होते.
दरम्यान, काही लोक लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या अफवा परवत असल्याचे सांगत आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशा विश्वास कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले.