नवी दिल्ली : राजस्थानात अल्वर येथे गायीची तस्करी करण्याच्या संशयातून जमावाने रकबर खान याला ठेचून ठार मारल्याच्या प्रकरणाचे पडसाद संसदेत उमटले असून, काँग्रेस खासदार करणसिंह यादव यांनी शून्य प्रहरात हा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील ही अशा प्रकारची चौथी घटना असल्याचे त्यांनी सांगितले. गोरक्षक म्हणवणाऱ्यांनीच ही हत्या केली असून, पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेण्यात दिरंगाई केल्याचा आरोप त्यांनी केला.

या वेळी भाजप सदस्यांनी खूप गोंधळ केला. रकबर खान (वय २८) याला गाय तस्कर असल्याच्या संशयावरून शनिवारी अल्वरमधील लालवंडी खेडय़ात जमावाने ठार मारले होते. करणसिंह यादव यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कथुआ बलात्कार व खून प्रकरण उपस्थित केले.

जम्मू काश्मीर सरकारमध्ये मंत्री असलेल्यांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना पाठिंबा दिला असा आरोप शिंदे यांनी केला. मध्य प्रदेशातील मंदसौर येथे मुलीवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा शिंदे यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, पण लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांना रोखले व या प्रश्नावंर राजकारण करू नका, मीही महिला आहे असे संतप्त महाजन यांनी सांगितले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले, की दरवर्षी ४० हजार महिलांवर बलात्कार होतात व त्यातील १९००० अल्पवयीन मुली असतात. बिहारमधील मुझफ्फरपूर येथे सरकारी आश्रमशाळात मुलींचे लैंगिक शोषण सुरू असल्याचा आरोप राजदचे हकालपट्टी केलेले खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी केला.