पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेला (UNGA) संबोधित केले. या भाषणानंतर केंद्रीय मंत्र्यांसह अनेक नेत्यांनी जागतिक स्तरावर मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांचे भाषण “उत्कृष्ट” असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मोदींच्या भाषणावरून टोमणा मारला आहे. तसेच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेश आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केला आहे.

काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणादरम्यान काही जागाच भरलेल्या गेल्या. पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणानंतर कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. “जेव्हा पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित केले, तेव्हा मी खूप निराश झालो की फक्त काही जागा भरल्या गेल्या आणि जेव्हा कोणीही टाळ्या वाजवल्या नाही तेव्हा ते आणखी निराशाजनक होते. त्यांनी लिहिले की संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमचे मिशन विस्कळीत झाले आहे, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदींच्या भाषणावरून योगी आदित्यनाथ आणि हिमंत बिस्वा शर्मा यांच्यावर टीका केली. “यूएनजीए मध्ये बोलताना, पंतप्रधान मोदींनी भारताला सर्व लोकशाहीची आई म्हटले आहे, मला आशा आहे की योगी जी आणि हिमंत बिस्वा शर्मा हे ऐकत असतील”, असे सिब्बल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेपुढे हिंदीत केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी, लोकशाही मूल्ये, भारताची आर्थिक प्रगती, करोना विषाणू साथीनंतरची जागतिक अर्थव्यवस्था, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, अफगाणिस्तानातील राजकीय परिस्थिती अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं. अफगाणिस्तानची भूमी दहशतवादाचा फैलाव करण्यासाठी किंवा दहशतवादी कृत्यांसाठी वापरली जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे असे अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत बोलताना मोदी म्हणाले.

दरम्यान, यावेळी जागतिक नेत्यांपुढे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा उल्लेखही पंतप्रधान मोदी यांनी केला. काही देश त्यांनाही दहशतवादाचा मोठा धोका आहे, हे माहीत असूनही दहशतवादाचा वापर राजकीय अस्त्र म्हणून करीत आहेत, अशी टीका मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख टाळून केली.