लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रो-टेम स्पीकर भर्तृहरी महताब यांना पत्र लिहित राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील, अशी माहिती दिल्याचे वेणूगोपाल म्हणाले.

हेही वाचा – लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक; काँग्रेसकडून खासदारांना व्हिप जारी, संसदेत हजर राहण्याच्या सूचना

महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेले गांधी घराण्यातील तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी हे पद भूषवलं आहे. दरम्यान, ९ जून रोजी झालेल्या काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करावी, यासंदर्भातील ठराव पारीत करण्यात आला होता. मात्र, मला यासंदर्भात विचार करण्यासाठी वेळ द्या, असे राहुल गांधी म्हणाले होते.

दरम्यान, २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत यंदा काँग्रेस चांगलं यश मिळालं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एकूण ९९ जागांवर विजय मिळवला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसला अनुक्रमे ४४ आणि ५२ जागांवर यश मिळालं होतं. या निवडणुकांमध्ये भाजपानंतर काँग्रेस हा दुसरा मोठा पक्ष ठरला होता. मात्र, अपुऱ्या संख्याबळामुळे काँग्रेसला विरोध पक्षनेते पदावर दावा करता आला नव्हता.

हेही वाचा – लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिघाडी? तृणमूलच्या खासदाराचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसचा एकतर्फी…”

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी आज खासदारकीची शपथ घेतली होती. यावेळी त्यांनी संविधानाची प्रत हातात पकडली होती. तसेच शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद जय संविधान’, अशी घोषणादेखील त्यांनी दिली होती.