काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात बोलत असताना पेगासस स्पायवेअरबाबत गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या मोबाईल फोनमध्येही पेगासस होतं असं सांगितलं. तसेच त्यावेळी एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांचा कॉल आल्याचं नमूद केलं.
राहुल गांधी म्हणाले, “माझ्या मोबाईल फोनमध्येही हेरगिरी करणारं पेगासस स्पायवेयर होतं. मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस होतं. मला एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने कॉल केला आणि सांगितलं की, फोनवर बोलताना सतर्क राहा. तुम्ही जे बोलत आहात ते आम्ही रेकॉर्ड करत आहोत.”
“आम्हाला सातत्याने हीच काळजी वाटत आहे. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. जी प्रकरण गुन्हेगारी स्वरुपाची नाही अशाही प्रकरणात माझ्यावर अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याविरोधातच आमचा लढा सुरू आहे,” असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.
“भारतात लोकशाहीवर हल्ला होत आहे”
राहुल गांधी पुढे म्हणाले, “प्रत्येकाला माहिती आहे की, भारतात लोकशाहीवर हल्ला होत आहे. याबाबत बातम्याही येत असतात. मी भारतातील विरोधी पक्षाचा नेता आहे आणि आम्ही तेथे विरोधी पक्षांचा अवकाश शोधत आहोत. संसद, स्वतंत्र माध्यमं, न्यायव्यवस्था, सगळीकडे फिरण्याचं स्वातंत्र्य या सर्वच गोष्टींवर बंधनं येत आहेत. लोकशाहीच्या मुलभूत ढाच्यावरच हल्ला होत आहे.”
हेही वाचा : “बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा, हाच का तुमचा…”, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
यावेळी राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये सादर केलेल्या पीपीटीमध्ये त्यांचा संसदेबाहेर पोलीस कारवाई करत असल्याचा एक फोटोही दाखवला. तसेच संसदेच्या समोर उभे राहून काही विषयांवर चर्चा केली म्हणून पोलिसांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकलं जातं, असा आरोपही केला.