Rahul Gandhi Criticizes PM Modi Foreign Policy over Iran US War Situation: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी काँग्रेसच्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली. “इराण आणि अमेरिका हे दोन्ही राष्ट्र भारताच्या जवळचे आहेत. या दोन देशांत युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांच्यातील आपले संबंध वापरण्याची मोठी संधी भारताने गमावली. पाकिस्तान या युद्धात मध्यस्थ म्हणून पुढे आला आणि भारताला फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागली”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
रचनात्मक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनात बोलत असताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर टीका केली. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या अनेक महिन्यांच्या युद्धात भारताने महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी गमावली, असे राहुल गांधी म्हणाले.
इंदिरा गांधी यांचा केला उल्लेख
आंतरराष्ट्रीय धोरणाबाबत सांगत असताना राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “इराणचे युद्ध सुरू आहे. भारताने जर आपली ताकद योग्य ओळखली असती आणि भारताचे नेतृत्व इंदिरा गांधींसारख्या नेत्याच्या हातात असते तर भारतासमोर जगातील सर्वात मोठी संधी होती.”
ही संधी कोणती होती? याबाबत माहिती देताना राहुल गांधी पुढे म्हणाले, “इराण, अमेरिका आणि रशिया हे राष्ट्र भारताचे मित्र आहेत. या मैत्रीचा वापर करून भारत प्रासंगिक बनू शकला असता. मात्र पाकिस्तानने भारताची जागा घेतली आणि तो मध्यस्थाच्या भूमिकेत गेला. पंतप्रधान मोदी फक्त पाहत राहिले.”
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "War broke out in Iran. For India—had it recognized its own strength and had its leader been someone like Indira Gandhi—this presented the greatest opportunity in the world. What kind of opportunity? Iran was our… pic.twitter.com/7KConkZODE
— ANI (@ANI) August 13, 2026
‘परराष्ट्र धोरण म्हणजे मिठ्या मारणे नाही’
पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेल्यानंतर जागतिक नेत्यांची गळाभेट घेत असतात. यावरून त्यांचे जागतिक नेत्यांशी संबंध किती घनिष्ठ आहे, असे भाजपाकडून सांगितले जाते. मात्र राहुल गांधी यांनी या प्रकारावर टीका केली. “यांच्या डोक्यात हे कुणी टाकले माहीत नाही. पण हे जेव्हा बाहेर जातात तेव्हा नेत्यांना मिठ्या मारतात”, असे सांगून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल करून दाखवली.
पाहा व्हिडीओ
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "I don't know where it came from; this idea got into their heads. I don't know who put it there or where it came from, the idea that foreign policy means hugging politicians. I was young. We went to America. Since… pic.twitter.com/5G3j1osvvT
— ANI (@ANI) August 13, 2026
‘मला मोदींच्या कार्यालयातील माहिती मिळते’
राहुल गांधी यांनी पुढे दावा केला की, पंतप्रधान मोदींच्या कार्यालयातील माहिती मला मिळते. अरुणाचल प्रदेशच्या भारत-चीन सीमेवर चीनने भारताला गस्त घालण्यापासून रोखले आहे. ही तुमची जमीन असली तरी तुम्ही इथे गस्त घालू शकत नाही, असे चीनने बजावले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा निघाली आहे. सीमेवर बरेच काही चालू आहे. पण सरकारमधील लोक माध्यमांना फोन करून याबाबतच्या बातम्या देण्यापासून रोखत आहेत. कोणताही विचार न करता, हे लोक देशाचे नुकसान करत आहेत.
भाजपाच्या नेत्यांनी देशाला आतल्या बाजूने कमकुवत केले आहेच. तसेच परराष्ट्र धोरणही बिघडवले आहे. आपल्या राजकीय बांधणीला पैसा मिळत राहो, यासाठी बऱ्याच गोष्टी यांनी केल्या आहेत, असाही आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
