Shashi Tharoor on India-US trade deal: अमेरिका आणि भारत देशांमध्ये आयात शुल्काबाबत नवीन व्यापारी करार झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी सोशल मीडियावर दिली होती. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याला दुजोरा देत भारतावरील आयात शुल्क कमी केल्याची माहिती दिली होती. ट्रम्प यांनीही ही माहिती त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली होती. आता या व्यापार करारावर स्पष्टता आणण्याचे आवाहन काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मंगळवारी केली. ‘भारतीय वस्तूंवरील शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी करणे सकारात्मक आहे परंतु सरकारने त्याचे तपशील स्पष्ट केले पाहिजेत. दोन्ही देशांतील नवीन व्यापारी कराराबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबतची अस्पष्टता लवकर दूर केली पाहिजे’, अशी मागणी थरूर यांनी केली.
भारत-अमेरिका व्यापार करारामुळे अमेरिकेतील भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. या करारामुळे अमेरिकेला भारतामध्ये अधिक कृषी उत्पादने निर्यात करण्यास मदत होणार आहे, असा दावाही अमेरिकेने केला आहे.
“केंद्र सरकार उत्तरदायी नाही का?”
“भारत आणि अमेरिकेत झालेल्या व्यापारी करारात काय काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. विरोधी पक्ष या करारातील स्पष्टता माग आहे. या करारातील बाबी आम्हाला माहित नाहीत. आपल्याकडे ट्रम्प आणि मोदी यांचे फक्त ट्विट आहे. त्यावरून कसं ठरवायचं की करार नेमका काय आहे? संसदीय लोकशाहीत एखाद्या कराराची एवढीच माहिती देणे पुरेसे आहे का? या कराराची सर्व माहिती सामान्यांना देण्यास केंद्र सरकार उत्तरदायी नाही का?”, असे प्रश्न विचारत थरूर यांनी आयात शुल्क कराराची स्पष्टता पुरवण्याची मागणी केली.
सोशल मीडियारील पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की भारताने ऊर्जा, शेती, कोळसा आणि तंत्रज्ञानासह अनेक अमेरिकन वस्तूंवर ५०० अब्ज डॉलर्सची खरेदी करण्याचे वचन दिले आहे. या करारामुळे आता अमेरिकेतून शेतीविषयक उत्पादने भारतात मोठ्या प्रमाणात आयात होणार आहेत. त्यामुळे थरूर यांनी या कराराचा भारतीय शेतकरी आणि व्यापारावर होणारा परिणाम काय कसा असेल?, भारताला इतर देशांमधून होणारी आयात कमी करावी लागेल का? असे प्रश्न विचारले. नवा व्यापार करार स्वागतार्ह आहे पण सरकारने पूर्ण पारदर्शकता प्रदान केली पाहिजे, असंही थरूर म्हणाले.
इतर देशांची आयात कमी करावी लागणार?
थरूर म्हणाले, ” ट्रम्प म्हणतात की ते शेतीसाठी करार महत्त्वाच ठरणार आहे. या करारात भारतीय शेतकऱ्यांसाठी काय संरक्षण आहे? ट्रम्प म्हणतात की ५०० अब्ज डॉलर्सच्या वस्तू भारत अमेरिकेकडून घेईल. पण भारताचे संपूर्ण आयात ही ७०० अब्ज डॉलर्स आहे. आता आपण इतर प्रत्येक देशाकडून खरेदी करणे थांबवणार का? जर ती चांगली बातमी असेल तर आम्हाला आनंद साजरा करायला आवडेल, परंतु आम्हाला स्पष्टता द्या”.

