Shashi Tharoor : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा केरळमधील तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात आहेत. या चर्चांचं कारण म्हणजे शशी थरूर हे अनेकदा मोदी सरकारचं कौतुक करताना पाहायला मिळाले आहेत. दुसरीकडे थरूर यांनी सलग तिसऱ्यांदा काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगताना पाहायला मिळाल्या आहेत.
यातच आता खासदार शशी थरूर यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. ‘बिहारची प्रगती पाहून आनंद झाला’, असं म्हणत खासदार शशी थरूर यांनी बिहारमधील एनडीए सरकारचं कौतुक केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
खासदार शशी थरूर काय म्हणाले?
“मी पूर्वी ऐकल्यापेक्षा आता बिहारमध्ये पायाभूत सुविधा खूप चांगल्या झाल्या आहेत. बिहारमधील पायाभूत सुविधा आणि रस्तेही चांगले आहेत. बिहारमध्ये लोक रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर असतात, आता पूर्वीसारखं नाही. मी आतापर्यंत जे पाहिलं त्यावरून असं दिसतं की वीज आणि पाणी यासह सर्व काही व्यवस्थित झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे बिहारबद्दलचं पूर्वीचं मत आता पूर्णपणे बदललं आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की अलिकडच्या काळात खूप चांगल्या गोष्टी झाल्या आहेत”, असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शशी थरूर यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “मला यात राजकारण आणायचं नाही. मात्र, बिहारमधील प्रगती पाहून मला नक्कीच खूप आनंद झाला आहे. बिहारचे लोक आणि त्यांचे प्रतिनिधी त्यासाठी श्रेय देण्यास पात्र आहेत”, असं म्हणत शशी थरूर यांनी बिहारमधील युती सरकारच्या कामाचं कौतुक केलं.
शशी थरूर यांची सलग तिसऱ्यांदा काँग्रेसच्या बैठकीला दांडी!
खासदार शशी थरूर यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारली होती. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीला थरूर गैरहजर राहिले होते. शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं कौतुक केल्यापासून काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांच्या भूमिकेबद्दल शंका घेतली जात आहे. यातच थरूर हे तिसऱ्यांदा बैठकीला गैरहजर राहिले. त्यानंतर आता शशी थरूर यांनी बिहारमधील एनडीए सरकारचं कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे.
