काँग्रेस मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली असून, देशभरात तीव्र निदर्शने करत आंदोलनाची हाक दिली. दिल्लीपासून पाटणा, जम्मू, कोलकाता, पंजाब, आसाम आणि अरुणाचल प्रदेशपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

दिल्लीत आंदोलन

दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयादिशेने मार्च काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथे नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या, पोलिसांनी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. “ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. आम्ही लोकशाहीचा अंत पाहणार नाही, गप्प बसणार नाही. याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे,” असे दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झळकवले बॅनर्स

रायसीना रोडवरील युवा काँग्रेस कार्यालयापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्च्यादरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि ज्ञानेश कुमार यांना प्रश्न विचारणारे अनेक फलक आणि बॅनर्स झळकवले.

विविध राज्यात आंदोलन, नेत्यांना घेतलं ताब्यात

आसाममध्ये आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई आणि अनेक कार्यकर्त्यांनाही निदर्शनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, पाटणामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी वॉटर कॅननद्वारे पाण्याचा मारा केला. याशिवाय कोलकाता, चंदीगड, जम्मू आणि देशातील इतर राज्यांमध्येही विरोधी पक्षांकडून निषेध मोर्चे काढण्यात आले. दरम्यान, काँग्रेसने २५ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयांवर मोर्चे काढण्याचे आदेश सर्व राज्यातील नेत्यांना दिले होते.

आयोगावर प्रश्नचिन्ह

गेल्या १० महिन्यांत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी निवडणूक आयोगाच्या १४ निर्णयांवर आणि आदेशांवर लेखी आक्षेप नोंदवला होता, असे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिले होते. यानंतर देशभरात निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यानंतर काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.