नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या  (एलआयसी) बहुचर्चित प्राथमिक सार्वजनिक समभागाच्या (आयपीओ) विक्रीला बुधवारपासून सुरुवात होत आहे. मात्र, कंपनीच्या समभागांचे मूल्यांकन जाणीवपूर्वक कमी करण्यात आल्याची गंभीर टीका मंगळवारी काँग्रेसने केली. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अन्य सार्वजनिक कंपन्यांची निर्गुतवणुकीची प्रक्रिया स्थगित केली आहे. मग, ‘एलआयसी’चा ‘आयपीओ’ विक्रीला का काढला जात आहे, असा सवाल काँग्रसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेसने घेतलेले आक्षेप

  • भारतीय आयुर्विमा कंपनी ‘’एलआयसी’’चे एकूण मूल्यांकन फेब्रुवारीमध्ये १२ ते १४ लाख होते, ते दोन महिन्यांमध्ये ६ लाख कोटीपर्यंत कमी कसे झाले?
  • ‘एलआयसी’च्या विक्रीला काढलेल्या समभागांचे मूल्य कंपनीच्या अंर्तनिहित मूल्याच्या (एम्बेडेड व्हॅल्यू) २.५ पट असेल असे जाहीर केले होते, आता हे मूल्य १.१ पट कसे झाले? हे मूल्य १.४ पटीने कमी का झाले?
  • शेअर बाजारात ‘एचडीएफसी लाइफ’च्या समभागांची विक्री अंर्तनिहित मूल्याच्या ३.९ पटीने होत आहे. तर, ‘एसबीआय लाइफ’ व ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ’ या आर्युविमा कंपन्यांच्या समभागांची विक्री अंर्तनिहित मूल्याच्या ३.२ व २.५ पटीने होत आहे. मग, ‘एलआयसी’च्या समभागांचे मूल्य कमी का?
  • ‘एलआयसी’चा एक समभाग १,१०० रुपयांनी विकला जाणार होता मग, आता तो ९०२ ते ९४९ रुपयांच्या दरम्यान का विक्रीला आणला जात आहे?
  • ‘एलआयसी’चे ५ टक्के समभाग विक्रीला काढून ७० लाख कोटी मिळवण्याचे केंद्राचे लक्ष्य होते, आता ३.५ टक्के समभागांची विक्री होणार आहे. १.५ टक्के कमी समभाग विक्राला काढले जातील. आता फक्त २१ लाख कोटी मिळू शकतील. लक्ष्य कमी का केले गेले?