Congress Muslim League Criticism surfaces: भाजपा हा जातीयवादी पक्ष आहे, अशी टीका काँग्रेसकडून नेहमी होत असते. मात्र आता काँग्रेसही याच विळख्यात अडकल्याची चर्चा आहे. काँग्रेसची आता मुस्लिम लीग झाली असल्याची टीका काँग्रेसच्याच एकेकाळी मित्र पक्ष असलेल्या पक्षाने केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली असता त्यातूनही हीच बाब प्रकर्षाने जाणवत आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने ३९० मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. यापैकी केवळ २१ जणांना विजय मिळवता आला. त्यातही २० मुस्लिम आमदार आहेत.
इंडिया टुडेने यासंबंधी एक लेख प्रकाशित केला आहे. केरळमध्ये काँग्रेसने इंडियन युनियन मुस्लीम लीगशी युती करत केरळची सत्ता मिळवली. पण आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र काँग्रेसने मुस्लिम पक्षांबरोबर युती केलेली नाही. तरीही त्यांचे २१ मध्ये २० आमदार मुस्लिम आहेत.
आसाम, पश्चिम बंगालमध्ये हिंदू मतांचे एकत्रीकरण
आसाम आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत हिंदू मतांचे एकत्रिकरण झालेले पाहायला मिळाले. यामुळे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या पक्षांना फटका बसला. २०१४ साली भाजपाचा केंद्रासह अनेक राज्यात मोठा विजय प्राप्त झाल्यानंतर काँग्रेसची मतपेटीबाबत पक्षाअंतर्गतही चिंता व्यक्त करण्यात येत होती. भाजपा हिंदू मते एकगठ्ठा घेत असताना काँग्रेसला मात्र विजयासाठी आता मुस्लिम मतांवर अवलंबून राहावे लागत आहे, असे निरीक्षण इंडिया टुडेने लेखात मांडले आहे.
आसाममध्ये काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडी करत १२६ पैकी ९९ जागांवर निवडणूक लढवली होती. ९९ पैकी केवळ १९ जागा जिंकण्यात त्यांना यश आले. पश्चिम बंगालमध्ये २९२ मतदारसंघात काँग्रेसने निवडणूक लढवली त्यापैकी दोन ठिकाणी त्यांचा विजय झाला. हे दोन्ही आमदार मुस्लिम आहेत.
आसाममध्ये एका बाजूला काँग्रेस मुस्लिम उमेदवारांना तिकीट देत असताना भाजपाने आणि त्यांच्या मित्र पक्षाने बिगर मुस्लिम उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. आसाममध्ये २०२१ च्या निवडणुकीत काँग्रेसने ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) शी युती केली होती. आसामच्या मुस्लीम बहुल भागात या पक्षाचे चांगले प्राबल्य आहे. मात्र २०२१ च्या निवडणुकीत या युतीचा काही लाभ न मिळाल्यामुळे काँग्रेसने यावेळी त्यांच्याशी युती केली नाही.
काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांची कामगिरी कशी होती?
आसाममध्ये ९९ पैकी १९ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला. ज्यात १८ उमेदवार मुस्लिम आहेत. पश्चिम बंगालमध्येही हाच प्रकार पाहायला मिळाला. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (UDF) १४० पैकी १०२ जागा जिंकल्या. केरळ विधानसभेत २५ मुस्लिम आमदार निवडून आले आहेत. ज्यापैकी ३० एकट्या यूडीएफचे आहेत.
या ३० पैकी २२ आमदार काँग्रेसचा मित्रपक्ष इंडियन युनियन मुस्लीम लीगचे आहेत. या पक्षाचा आधारस्तंभच मुस्लीम मतदार आहेत. काँग्रेसचे ६३ आमदार जिंकून आले आहेत. ज्यात आठ मुस्लिम आहेत.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने २९२ पैकी ६३ मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले होते. हा आकडा तृणमूल काँग्रेसपेक्षाही अधिक होता. टीएमसीने ४७ मुस्लिम उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मतदारसंघातील लोकसंख्येचे बदललेले गणित, स्थानिक आघाड्या आणि मतांच्या टक्केवारीमुळे आसाम आणि पश्चिम बंगालमधील निकालांवर परिणाम झालेले पाहायला मिळत आहेत. त्यातही अल्पसंख्याक बहुल भागात काँग्रेस चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
काँग्रेस मुस्लीम लीग झाल्याची टीका कुणी केली?
काँग्रेस अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करतो किंवा तो जातीयवादी पक्ष आहे, अशी टीका होत आहे. मात्र ही टीका भाजपाने केली नसून एकेकाळी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या AIUDF पक्षाने केली आहे. AIUDF चे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी आसामचे निकाल लागल्यानंतर म्हटले की, ‘काँग्रेस पक्ष आता मुस्लीम लीग झाला आहे.’
काँग्रेसने AIUDF साठी खड्डा खणला होता. मात्र तेच अखेर त्या खड्ड्यात पडले. आसामचा विषय आता संपला आहे. काँग्रेसची मुस्लीम लीग झाली याचा खेद वाटतो, अशी टीका बदरुद्दीन अजमल यांनी केली.
काँग्रेसच्या माजी नेत्याकडूनही इशारा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री एके अँटोनी यांनी २०१४ च्या लोकसभा पराभवानंतर त्याचे विश्लेषण करताना म्हटले की, अल्पसंख्याकांशी काँग्रेसची जवळीक निर्माण झाल्यामुळे इतर समूह काँग्रेसपासून दूर जात आहेत. पराभवानंतर त्याचे विश्लेषण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली होती.
केरळमधील एका कार्यक्रमात बोलत असताना अँटोनी म्हणाले, काँग्रेसने सर्व समाजासाठी समान अशी भूमिका ठेवून योजना आखल्या, पक्षीय भूमिका ठेवली. तरीही काँग्रेस काही समुदायांचा अधिक विचार करत असल्याची भावना समाजातील एका वर्गात पसरत आहे. हा समज मोडून काढण्यासाठी काँग्रेसने प्रत्यक्ष कृतीत काही कार्यक्रम उतरवणे गरजेचे आहे, अशी गरज अँटोनी यांनी व्यक्त केली होती.
अँटोनी यांनी दिलेला इशारा आता खरा ठरताना दिसत आहे. एकेकाळच्या मित्रपक्षानेच याबद्दलचे निरीक्षण मांडले आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या नेत्यांनीही काँग्रेसवर यापूर्वी मुस्लीम लीग असल्याची टीका केली होती.
