जयपूर येथील चिंतन शिबिरात नवनियुक्त काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षचं माझे आयुष्य असल्याचे म्हटले. काँग्रेस पक्षाच्या उत्तम कामगिरीमुळे आज प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, काँग्रेसपक्ष प्रत्येकासाठी काम करतो आणि लोकांचा आवाज ही काँग्रेसची ताकद असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सरकारने योजलेली थेट अनुदान योजना फायद्याची आहे. या मार्फत आता शंभर रुपयांमधले ९९ रुपये लोकांपर्यंत पोहचतील. असे राहुल गांधी यांनी आधार योजनेबद्दल मत व्यक्त केले. देशात संधी न मिळाल्यामुळे युवकांमध्ये नाराजी आहे तसेच देशाच्या राजकारणात सामान्य व्यक्ती यायला हवा,असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या उपाध्यक्षपदावर निवड केल्याबद्दल राहुल गांधी म्हणाले की, “मला दिलेल्या पाठींब्या बद्दल मी सर्वांचा आभारी आहे. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. गेल्या आठ वर्षात पक्षाने मला बरेच काही शिकवले आहे.महात्मा गांधींच्या तत्वावर काँग्रेसचा विश्वास आहे. प्रत्येक भारतीयाला काँग्रेसचा पाठींबा आहे”