प्रदेश काँग्रेस नेत्यांची ‘सुस्ती हटाव’ बैठक

संघटनात्मक बळकटीसाठी खरगेंची दिल्लीत मत आजमावणी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

संघटनात्मक बळकटीसाठी खरगेंची दिल्लीत मत आजमावणी

प्रदेश काँग्रेसमध्ये आलेली सुस्ती घालवण्यासाठी नवनियुक्त प्रभारी मलिक्कार्जुन खरगे यांनी शनिवारी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. पक्ष संघटनेमध्ये तातडीने बदल करण्यात येणार नसले तरी तालुका स्तरापासून राज्यस्तरापर्यंत संघटनेत ‘ऊर्जा’ निर्माण करण्यासाठी काय करता येईल, यावर साधकबाधक चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. खरगे यांनी प्रभारी झाल्यानंतर काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची ही पहिलीच बैठक होती.

वास्तविक, राज्याची सत्ता गेल्यानंतर काँग्रेसमध्ये कमालीची मरगळ आल्याचे पक्ष संघटनेत बोलले जात होते. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच अधिक बळकट होऊ लागली आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अस्तित्व दिसले नाही. काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष नेमलेले नाहीत. कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य वाढू लागलेले आहे. पक्ष संघटनेत आणि नेतृत्वात आक्रमकता आणली पाहिजे, असा सूर राज्यातील काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. त्याची दखल पक्षज्येष्ठींनी घेतल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी बदलण्यात आले आणि आता संघटनात्मक बदलाच्या दृष्टीने प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा जेमतेम वर्षभरावर आल्या असून कदाचित विधानसभा निवडणुकाही एकत्रित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस पक्षाला भाजप सरकारविरोधात आक्रमक व्हावे लागणार आहे. पण, त्यासाठी काँग्रेसमधील नेत्यांना एकत्रित आणावे लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर खरगे यांनी घेतलेली बैठक महत्त्वाची मानली जात आहे. प्रदेश काँग्रेसमधील सगळ्या नेत्यांना एकत्र करून त्यांचे राज्यातील राजकीय स्थितीबाबत आणि पक्ष संघटनेबाबत काय मत आहे हे आजमावण्यासाठी ही बैठक घेतली, असे खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. काँग्रेस पक्ष एक होऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवेल. त्यासाठी संघटना कशी मजबूत करायची, राज्य सरकारविरोधात लोकांचे कोणते प्रश्न विधानसभेत मांडायचे यावर सर्वच नेत्यांनी सविस्तर चर्चा केली, असेही खरगे म्हणाले.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, संजय निरुपम आदी प्रदेश काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची फौज उपस्थित होती. संघटनात्मक बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पक्षाचे आगामी कार्यक्रम, दौरे याबाबत चर्चा झाली, असेअशोक चव्हाण यांनी सांगितले.

..तर पर्यायी योजना तयार

राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून लढवण्याचा निर्णय झालेला आहे. राष्ट्रवादीशी जागावाटपाची चर्चा करण्याबाबतही काँग्रेस सकारात्मक आहे. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलणी फिसकटली तर स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचीही तयारी असायला हवी असे मत काही नेत्यांनी बैठकीत मांडल्याचे समजते. त्यामुळे निवडणुकीचा ‘प्लॅन बी’ कसा बनवायचा हा मुद्दाही चर्चिला गेल्याचे कळते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress party ncp

ताज्या बातम्या