नवी दिल्ली : काँग्रेसने पक्षाच्या घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असून सुमारे ८५ बदल केले जाणार आहेत. पक्षातील सर्व स्तरांतील ५० टक्के पदे दलित, आदिवासी, ओबीसी, मागास, महिला आणि तरुणांसाठी राखीव ठेवली जातील, अशा महत्त्वाच्या घटनात्मक बदलाचा प्रस्ताव काँग्रेसच्या रायपूर महाअधिवेशनात ठेवण्यात आला असून या बदलांना रविवारी अधिकृत मंजुरी दिली जाईल.
ब्लॉक समिती, जिल्हा समिती, प्रदेश समिती, राष्ट्रीय समिती आणि कार्यकारिणी समिती या सर्व स्तरांवरील पक्षाच्या समित्यांमधील ५० टक्के पदे दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना ५० टक्के आरक्षित असतील. शिवाय, आरक्षित पदे आणि खुली पदे या दोन्ही पदांवर मिळून ५० वर्षांखालील तरुणांना तसेच, महिलांसाठी ५० टक्के पदे राखीव असतील.
पक्षाच्या कार्यकारिणी समितीची सदस्य संख्या २५ होती, आता ती वाढवून ३५ करण्यात आली आहे. त्यातील ५० टक्के जागा राखीव असून हे सदस्य दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्य, महिला आणि तरुण असतील. पक्षाचे आजी-माजी पंतप्रधान व पक्षाध्यक्ष हेही सदस्य असतील. त्यामुळे पक्षामध्ये उभे आणि आडवे असे दुहेरी आरक्षण देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
नोंदणी आता ऑनलाइन
* काँग्रेसची सदस्य नोंदणी आता फक्त ऑनलाइन केली जाणार आहे. पक्षातील कामकाज विनाकागद करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
* बुथ हा प्राथमिक स्तर असेल. पंचायत समिती, मंडळ समिती, ब्लॉक समिती, जिल्हा समिती आणि प्रदेश समिती अशी संघटनात्मक रचना करण्यात आली आहे.
* पक्षाच्या सदस्यत्वाच्या अर्जामध्ये स्त्री-पुरुषसह तृतीय पंथीय या वर्गवारीचाही समावेश असेल.
* सदस्याला वडिलांसह आई तसेच पत्नीचे नावही लिहिता येईल.
* विविध स्तरांवर निवडून आलेल्या काँग्रेसच्या प्रतिनिधींना प्रदेश समितीचे सदस्य असतील.
* प्रदेश समितीतील ८ सदस्यांऐवजी ६ सदस्यांमागे १ प्रतिनिधी राष्ट्रीय समितीचा सदस्य असेल. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्यांची संख्या १२४० वरून १६५३ वर गेली आहे.