काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पक्षाचे उमेदवार ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनी प्रतिस्पर्धी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनी एकमेकांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीचा फोटो थरुर यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये दोन्ही नेते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. “ही शत्रूंमधील लढाई नाही, तर सहकाऱ्यांमधील मित्रत्वाची स्पर्धा आहे”, असे कॅप्शन थरुर यांनी या फोटोला दिले आहे. काँग्रेसचा विजय हेच दोघांचे लक्ष्य असल्याचे थरुर म्हणाले आहेत.

Congress President Election: अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गेहलोत यांची माघार, सोनिया गाधींची मागितली माफी

ही पोस्ट रिट्विट करत थरुर यांच्याशी सहमत असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. आमचा लढा सांप्रदायिक शक्तींच्या विरोधात असून आम्ही दोघेही गांधी आणि नेहरुंची विचारधारा मानतो, असे ट्वीटमध्ये दिग्विजय सिंह म्हणाले आहेत. राजस्थानमधील बंडानंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माघार घेतली आहे. यामुळे या पदासाठी थरुर आणि सिंह मुख्य उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही नेते शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शशी थरुर यांनी मजरुह सुलतानपुरींचा शेर केला ट्वीट, लोक म्हणाले “त्यांना तर नेहरुंनी सरकारविरोधी लिखाण केल्याने…”

राज्यसभा खासदार आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह गांधी कुटुंबियांचे निष्ठावंत मानले जातात. तर शशी थरुर काँग्रेसच्या जी-२३ गटातील आहेत. या गटातील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षांतर्गत बदलांची मागणी केली होती. काँग्रेसने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. याच दिवशी काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.