काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत खरगे यांनी ७ हजार ८९७ मतं मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरुर यांचा पराभव केला आहे. ही निवडणूक पार पडल्यानंतर शशी थरुर यांच्या गटातून निवडणूक प्रक्रियेबाबत काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या समर्थकांनी केला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना लिहिलेल्या पत्रात शशी थरुर यांचे निवडणूक प्रभारी सलमान सोझ यांनी ही तक्रार केली आहे.

२४ वर्षांनंतर काँग्रेसला मिळाले गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष; मल्लिकार्जुन खर्गेंची बहुमताने निवड!

उत्तर प्रदेशात झालेली निवडणूक प्रक्रिया विश्वासाहर्ता आणि मुल्यांना धक्का पोहोचवणारी असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील मतपेट्या पांढऱ्या प्लास्टिक टॅग आणि क्रमांकाशिवाय सील करण्यात आल्या होत्या. हा प्रकार निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या मतपेट्यांवर नंतर योग्य पद्धतीने सील लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हा त्यांचा दावा खोटा असल्याचे सांगत अनधिकृत सील लावलेल्या मतपेट्यांचे फोटो कार्यकर्त्यांकडून शेअर करण्यात आले आहेत.

तुमच्या राजकारणात जास्तीची चहापावडर टाकून कोणी कडवटपणा आणतंय का? पंकजा मुंडे म्हणाल्या…

मतदान कर्मचाऱ्यांशिवाय केंद्रात परवानगी नसताना काही व्यक्तींची उपस्थिती होती. यामध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांचे प्रस्तावक ओमवीर यादव यांचा समावेश होता. “यादव मतदान केंद्रात काय करत होते हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. ते त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी नक्कीच त्याठिकाणी नव्हते” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. जे मतदार मतदानाच्या दिवशी लखनऊमध्ये नव्हते, त्यांच्या नावावरदेखील मतदान झाले आहे. यामुळे खरे मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहिल्याचे नमुद करतानाच प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या समर्थकांना धमकावल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. प्रदिप नर्हवाल, तौकिर आलम आणि धीरज गुर्जर यांनी केंद्रात मतदारांना प्रभावित केल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.