नागरकोईल (तामिळनाडू) : ‘काँग्रेसचा अध्यक्ष होण्याबाबत किंवा न होण्याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. काय होते आहे, ते तुम्हाला निवडणुकीनंतर समजेल,’ असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेसची विचारधारा मानणारा सदस्य या नात्याने सहभागी झालो आहे, असेही ते म्हणाले.

कन्याकुमारीतून सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असताना त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. मात्र ‘मी अध्यक्ष होत आहे किंवा होत नाही, हे तुम्हाला निवडणुकीनंतर समजेल. मी जर निवडणुकीला उभा राहिलो नाही, तर मला कारण विचारा. माझा निर्णय झाला आहे आणि त्याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही,’ असे उत्तर गांधी यांनी दिले. ‘भाजपने देशातील सर्व यंत्रणांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यांच्याकडे दबावतंत्र आहे. त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांशी मी काय चर्चा करणार,’ असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.