भारताने महत्त्वाकांक्षी ‘मिशन शक्ती’ अभियानांतर्गत क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडण्यात यश मिळवले. अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारताच्या या यशाचे मानकरी असलेल्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले असून आम्हाला तुमचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींना उपहासात्मकरित्या उद्देशून त्यांनी या शुभेच्छा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Well done DRDO, extremely proud of your work.
I would also like to wish the PM a very happy World Theatre Day.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 27, 2019
पंतप्रधान मोदी यांनी सकाळी ट्विट करून आपण मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी देशाला संबोधित करताना डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीची माहिती दिली. लो अर्थ ऑर्बिटमध्ये भारताने अँटी सॅटेलाइट मिसाइलद्वारे (उपग्रहवेधी क्षेपणास्त्र) एक उपग्रह पाडले. अवघ्या तीन मिनिटांमध्ये हे उपग्रह पाडण्यात आले. ३०० किलोमीटर अंतरावरुन लक्ष्यभेद करण्यात यश आले असून ही चाचणी यशस्वी झाल्याने अंतराळातही भारताची सुरक्षा भक्कम झाली आहे. अँटी सॅटेलाइट मिसाइलमुळे देशावर नजर ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपग्रहांवर वचक ठेवणे शक्य होणार आहे, अशी माहिती मोदींनी दिली होती.
त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्याचवेळी त्यांनी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त पंतप्रधान मोदींना आवर्जुन शुभेच्छा दिल्या.
