मोदी सरकार हे सगळ्या आघाड्यांवर अपयशी -राहुल गांधी

गांधीनगर येथील भाषणात राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडक उद्योजकांसाठी कार्यरत आहेत, देशासाठी काम करत नाहीत असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. शेतकऱ्यांचं कर्ज असेल, बेरोजगारी असेल एकाही प्रश्नावर हे सरकार यशस्वी ठरलेले नाही. नोटाबंदीचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला तोही त्यांच्या चुकीच्या निर्णयांपैकीच एक निर्णय होता. कारण या निर्णयामुळे सामान्य उद्योजकांचा कणाच मोडला अशीही टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच सगळ्याच आघाड्यांवर हे सरकार सपशेल अपयशी ठरल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नोटाबंदीनंतर ज्या रांगा बँकांमध्ये लागल्या होत्या त्यामध्ये तुम्ही नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना पाहिलंत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम खोटं बोलण्याचं काम केलं. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे अशी किती माणसं तुम्हाला रांगेत दिसली? २०१९ मध्ये काँग्रेसचं सरकार आल्यास आम्ही सध्याच्या गब्बर सिंग टॅक्समध्ये बदल करू आणि एकच जीएसटी टॅक्स लागू करू अशीही घोषणा राहुल गांधी यांनी केली. आम्ही इथे बैठक घेण्याचं कारणच हे होतं की ही दोन विचारांमधली लढाई आहे. एकीकडे द्वेष पसरवण्याचं राजकारण आहे जे भाजपाकडून केलं जातं आहे. दुसरीकडे आमची विचारधारा आहे जी प्रेम आणि आपुलकी, बंधुभाव यावर विश्वास ठेवते असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. बेरोजगारीचा प्रश्न सोडवला नाही. पंधरा लाख देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र तेही त्यांनी पाळलं नाही. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी म्हटले होते मला पंतप्रधान बनवू नका मी देशाचा चौकीदार म्हणून काम करणार आहे, मात्र चौकीदार चोर आहे हेच पाच वर्षात उघड झाले आहे. नरेंद्र मोदी वायुसेनेचे प्रशंसा करतात मात्र मात्र ३० हजार कोटींची चोरी याच वायुसेनेच्या खिशातून काढून नरेंद्र मोदींनी अनिल अंबानी यांचा फायदा करून दिला हे ते मान्य करत नाहीत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. गांधी नगर या ठिकाणी राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण करत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress president rahul gandhi criticised pm narendra modi in his gandhi nagar speech

ताज्या बातम्या