देशात अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, समाजात जाणीवपूर्वक भेदभाव निर्माण केला जात आहे. निष्पाप लोकांवर अत्याचार आणि गैरवर्तन केले जात आहे. या विरोधात एकत्र उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले.

महिनाअखेर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या बिहारमधील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शुक्रवारी सोनिया गांधी यांनी भाजपप्रणीत राज्य सरकारे व केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी हाथरसमधील दलित मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख केला नाही. मात्र, महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही महापुरुषांच्या विचारांची आठवण भाषणात करून दिली. महिला, गरीब, दलित समाजाला शिक्षित आणि सशक्त बनवण्याचा गांधीजींनी पण केला होता. गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने इंग्रजांच्या दहशत आणि शोषणायुक्त राजवटीतून सुटका केली होती, असे सोनिया म्हणाल्या.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) महत्त्व पटवून देताना सोनियांनी मोदी सरकारवर टीका केली. ग्रामीण भागात बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने नरेगा लागू केली गेली तेव्हा या योजनेला कोणी विरोध केला होता? त्याची कोणी टिंगल केली होती? मनरेगासारखी योजना नसती तर करोनाच्या काळात कोटय़वधी भूकबळी गेले असते, असा शाब्दिक प्रहार सोनियांनी केंद्र सरकारवर केला.

करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीत लाखो स्थलांतरित मजुरांना रोजगार नष्ट झाल्यामुळे मूळ गावी परतावे लागले होते. त्यांना पुन्हा रोजगार देऊन त्यांना जगण्याइतके पैसे मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारला मनरेगाची व्याप्ती वाढवावी लागली होती.

आजघडीला देशात अशा योजना राबवल्या जात आहेत ज्यातून काही लोक गब्बर होत आहेत. त्याची तुलना पूर्वी चंपारण्यातील निळेची शेती करून गब्बर झालेल्या लोकांशी करता येऊ  शकेल. दुसऱ्या बाजूला कोटय़वधी तरुणांचे रोजगार काढून घेतले जात आहेत. लाखो छोटे उद्योग बंद पडले आहेत. शेतकऱ्यांची किती दुरवस्था झाली हे सगळे पाहात आहेत. रोजगार देणाऱ्या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण होत आहे. नवे रोजगार निर्माण करणे सोडूनच द्या, ज्यांना रोजगार मिळाला होता, त्यांच्या हातून तो गेला, असे सोनिया म्हणाल्या.

घटना दुर्दैवी -रवीशंकर प्रसाद

* हाथरसमधील घटना दुर्दैवी होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीसाठी ‘एसआयटी’ नेमली असून आरोपींना अटक केली आहे. बलात्कार झाला की नाही याचे उत्तर पोलिसांनी दिलेले आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली.

* हाथरसची घटना निंदनीयच आहे. पण, त्यावर राजकारण करणे योग्य नव्हे. राहुल व प्रियंका गांधी निषेध नोंदवायला हाथरसला निघाले होते, पण काँग्रेसशासित राजस्थानमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत त्यांचे काय म्हणणे आहे. त्यांची भूमिका पक्षपाती आहे, अशी टीका केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केली.

पुद्दुचेरीत उपोषण..

हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याच्या विरोधात पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी व त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी शुक्रवारी उपोषण केले. त्यांनी राहुल व प्रियंका यांना देण्यात आलेल्या वागणुकीचा निषेध केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. व्ही. सुब्रमणियन यांनी उपोषणाचे नेतृत्व केले. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, अ.भा. काँग्रेस समिती नेत्यांशी पोलिसांनी केलेले वर्तन लोकशाहीविरोधी होते व त्यात लोकशाही हक्कांची पायमल्ली करण्यात आली.