काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पत्र लिहिले आहे. ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा अवधी त्यांनी मागितला आहे. करोना आणि फुफ्फुसाच्या संसर्गातून पूर्णपणे बरी होईपर्यंत आराम करु द्यावा, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथिक मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्य़ास सांगितले आहे.

हजेरी पुढे ढकलण्याची मागणी
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, “कोविड आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सोनिया गांधी यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी ईडीला पत्र लिहून त्या पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांची हजेरी काही आठवडे पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

गेले ६ दिवस राहुल गांधींची चौकशी
करोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. नॅशनल हेराल्ड प्रकरणी गेले ६ दिवस काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची चौकशी केली जात आहे. देशभरात काँग्रेस नेत्यांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. राहुल गांधी यांची पाच दिवसांत ५४ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली असून त्यादरम्यान मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सध्या ईडीने राहुल गांधी यांना कोणतेही नवीन समन्स जारी केले नसल्यामुळे त्यांची चौकशी संपली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.