काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींसोबत सेल्फी काढणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात लखनऊ पोलीस आयुक्तांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी नियमाचं उल्लंघन केलं आहे का याची तपासणी करण्यासाठी आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांना चौकशी करण्यास सांगितलं आहे. पोलीस उपायुक्तांनी रिपोर्ट सादर केल्यानंतर आयुक्तांकडून कारवाईसंबंधी निर्णय घेतला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी बुधवारी पोलीस कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आग्राला निघाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असताना अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांना सेल्फीसाठी विनंती केली. यावेळी प्रियंका गांधींनी संमती दर्शवत त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले.

यानंतर प्रियंका गांधी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काढलेला फोटो ट्वीट करत म्हटलं की, “या फोटोमुळे योगीजी इतके चिंतेत आहेत की, त्यांना या महिला पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करायची असल्याचं मला कळत आहे”.

“माझ्यासोबत फोटो घेणं गुन्हा असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे. या मेहनती आणि निष्ठावान पोलीस महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं करिअर सरकारने उद्ध्वस्त करणं योग्य नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीत ४० टक्के महिलांना संधी देणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावर पत्रकारांनी कारण विचारलं असता त्यांनी का नाही? माझ्या पद्धतीने असतं तर ५० टक्के दिलं असतं असं उत्तर दिलं. दरम्यान काँग्रेसने अद्याप उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष किंवा इतर विरोधी पक्षांसोबत युती करण्यासंबंधी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress priyanka gandhi says punish me instead after policewomen face probe for clicking selfie with her sgy
First published on: 21-10-2021 at 08:10 IST