जामिया विद्यापीठ हिंसाचार: प्रियंका गांधींचं इंडिया गेटवर ठिय्या आंदोलन

प्रियंका गांधी यांच्यासोबत अनेक वरिष्ठ काँग्रेस नेतेही आंदोलनाला बसले आहेत

दिल्लीमधील जामिया विद्यापीठ आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात करण्यात आलेल्या पोलीस कारवाईविरोधात काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांनी निषेध व्यक्त केला असून इंडिया गेटवर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, ए के अँटनी यांच्यासहित अनेक ज्येष्य नेतेही आंदोलनाला बसले आहेत. प्रियंका गांधी जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन करणार आहेत.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला असून देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी यावरुन टीका करताना केंद्र सरकारवर टीका केली असून हे भ्याड सरकार आहे अशा शब्दांत निषेध व्यक्त केला होता.

“पोलीस विद्यापीठात घुसखोरी करत असून विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत. सरकारने पुढे येऊन लोकांचं म्हणणं ऐकून घेणं अपेक्षित असताना भाजपा सरकार मात्र दिल्ली, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील विद्यार्थी आणि पत्रकारांचा आवाज दाबत आहे. हे भ्याड सरकार आहे,” असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं होतं.

प्रियंका गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा देताना तरुणांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही असं म्हटलं होतं. “सरकारला जनतेच्या आवाजाची भीती वाटत आहे. हुकूमशाहीच्या सहाय्याने सरकार तरुणांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला होता.

आणखी वाचा- सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेला हिंसाचार दुर्दैवी – नरेंद्र मोदी

हिंसाचार दुर्दैवी – नरेंद्र मोदी
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरुन नाही”.

“सुधारित नागरिकत्व कायदा दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर झाला आहे. अनेक राजकीय पक्ष आणि खासदारांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. स्वीकृती, सुसंवाद, करुणा आणि बंधुता ही भारताची अनेक दशकांपासून चालत असलेली जुनी परंपरा असून हा कायदा तेच दर्शवतो,” असंही मोदींनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “या कायद्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिक किंवा धर्माला धक्का लागणार नाही असं मी सर्व भारतीयांना आश्वासन देतो. कोणत्याही भारतीयाला या कायद्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. हा कायदा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी गेली कित्येक वर्ष बाहेर छळ सहन केला असून त्यांच्याकडे भारताशिवाय इतर कोणताही पर्याय नाही”.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress priyanka gandhi vadra amended citizenship law india gate central government delhi clash sgy

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या