नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधातील कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) मोर्चात तरुण आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या अत्याचाराविरोधात काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी-वढेरा आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानाबाहेर दोन तासांहून अधिक काळ धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे काँग्रेसने सरकारवर दबाव वाढवल्याचे मानले जाते. यातून बर्‍याच दिवसांनंतर काँग्रेस पक्ष एखाद्या मुद्द्यासाठी रस्त्यावर उतरल्याची चर्चा राजधानीत होती.

विशेष म्हणजे या आंदोलनाबद्दल पोलिसांना कळू नये यांची दक्षता काँग्रेसने घेतली होती. पक्षाच्या खासदारांनाही शेवटच्या क्षणापर्यंत माहिती देण्यात आली नव्हती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी त्यांना बोलावण्यात आले. तिथे आंदोलनाची माहिती देण्यात आल्याचे पक्षातील एका खासदाराने सांगितले. दोन तासांहून अधिक काळ आंदोलननाट्य रंगले होते. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांना ताब्यात घेतले व सायंकाळी सोडून दिले.

‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारांचा मुद्दा राहुल गांधी सातत्याने मांडत असले तरी, याच मुद्द्यावरील जंतर-मंतरवरील आंदोलनापासून काँग्रेस दूर राहिला होता. मात्र, मंगळवारी तरुण मोर्चेकरांना झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी समांतर आंदोलन केले. या निदर्शनामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या. त्यामुळे मोदींविरोधात ‘इंडिया’ आघाडीने मोर्चा उघडल्याचे चित्र निर्माण झाले. ‘विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला आहे. देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्‍या सरकारने उत्तर द्यावे’, असे राहुल गांधींनी ‘एक्स’वर नमूद केले.

केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आंदोलनस्थळी जाऊन राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधींनी सुरुवातीला नीट प्रकरणावर संसदेत चर्चेची मागणी केली होती. सरकारने त्याची तयारीही दाखवली होती. पण, त्यानंतर काँग्रेसने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. मात्र, राहुल गांधी यांनी आंदोलनादरम्यान आपली मागणी बदलल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधींशी झालेली चर्चा निष्फळ झाल्यानंतर पोलिसांनी काँग्रेससह इतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते.