Congress Protest RSS Headquarters Delhi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील केशव कुंज मुख्यालयाबाहेर मंगळवारी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय असंघटित कामगार विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदित राज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अचानकपणे आयोजित केलेल्या या आंदोलनानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत मनुस्मृती ग्रंथाच्या प्रती तसेच आरएसएसचा प्रतिकात्मक गणवेशाचे दहन केले.
शुद्धीकरणाच्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर त्याच मैदानावर शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून वाद होत आहे. याच अनुषंगाने हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच, हल्द्वानी येथील घटनेवर टीका केल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला.
डॉ. उदित राज काय म्हणाले?
“मला ताब्यात घेण्यात आले आहे. मी केशव कुंज आरएसएस मुख्यालयात आलो होतो… मी मनुस्मृतीचे दहन केले. आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा अपमान करण्यात आला असून राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे”, असे काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ANI शी बोलताना सांगितले
आरएसएसवर टीका
“आरएसएस आणि सत्ताधारी पवित्र संविधानाची जागा मनुस्मृतीच्या प्रतिगामी तत्त्वांनी घेण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा आरोप उदित राज यांनी ताब्यात घेण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी त्यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते याचा संदर्भ देखील दिला. “खरगे यांच्या सभेनंतर करण्यात आलेला शुद्धीकरणाचा विधी, अस्पृश्यता आजही पाळली जात असल्याचे आणि व्यवस्थेकडून तिला पाठिंबा दिला जात असल्याचे सिद्ध करतो. दलित समाज किंवा देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही”, असे राज म्हणाले.
पोलिसांनी परिस्थितीवर मिळवले नियंत्रण
दरम्यान, आंदोलकांनी मनुस्मृतीच्या प्रती आणि आरएसएसचे प्रतिकात्मक गणवेशाचे दहन करण्यास सुरुवात करताच दिल्ली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याने आरएसएस मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
