नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी संविधानातील तरतुदींचे आणि त्यामागील भावनेचे उल्लंघन केले असून, त्यांनी निवडणूक लोकशाहीचा पायाच पद्धतशीरपणे कमकुवत केला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने बुधवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशार्यावर काम करणारे असे संबोधत काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शुक्रवारी ‘सार्वजनिक महाभियोग’ आंदोलन करण्याची घोषणा केली.
दिल्लीच्या अशोका हॉटेल येथे ‘सार्वजनिक महाभियोग’ आंदोलन करण्यासाठी काँग्रेसने परवानगी मागितली होती. पण पोलिसांनी ती नाकारली. इतर ठिकाणीही परवानगी नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नवी दिल्लीतील १०, राजाजी मार्ग येथील निवासस्थानी दुपारी ३.३० वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.
‘मुख्य निवडणूक आयुक्तांनी संविधानातील तरतुदींचे आणि त्यामागील भावनेचे स्पष्टपणे उल्लंघन केले आहे. त्यांनी निवडणूक लोकशाहीचा पायाच पद्धतशीरपणे खिळखिळा केला. इतकेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयातही खोटे बोलले,’ असा आरोप रमेश यांनी समाजमाध्यमांवरील संदेशातून केला.
‘या जोडगोळीच्या वतीने त्यांनी स्वेच्छेने शिक्षा देणार्याची भूमिका बजावली आहे. आता या जोडगोळीची वेळ येईल,’ असे म्हणत रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.
निवडणूक व्यवस्था उद्ध्वस्त केल्यानंतर लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवणार्यांना गप्प करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कितीही अडथळे आणले, तरी मोदी-शहा यांचे प्यादे असलेल्या ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. येथे रोखले, तर अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरही धरणे देऊ. – के. सी. वेणुगोपाल, सरचिटणीस, काँग्रेस
