‘दहशतवादी होऊन भाजप कार्यकर्त्यांना राहुल गांधींचा जीव घ्यायचा होता का?’

राहुल गांधींनी पोलिसांऐवजी स्वीय सहाय्यकाचे ऐकले, राजनाथ सिंह

काँग्रेसने लोकसभेत दगडफेकीचा मुद्दा उपस्थित केला.

गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर झालेल्या दगडफेकीचे पडसाद मंगळवारी लोकसभेत उमटले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी दगडफेक करत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, मग गुजरातमध्ये दहशतवादी कुठून आले? जम्मू काश्मीरमधून आले की भाजपचे कार्यकर्ते दहशतवादी बनून राहुल गांधींचा जीव घेणार होते, असा सवाल काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारला. यावर भाजप खासदारांनी आक्षेप घेतल्याने कामकाज तहकूब करावे लागले.

गुजरातमधील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांच्या कारवर भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या एका नेत्याला अटकही केली होती. मात्र या घटनेवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मंगळवारी संसदेतही या घटनेचे पडसाद उमटले.

काँग्रेसने लोकसभेत दगडफेकीचा मुद्दा उपस्थित केला. मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर तिखट शब्दात टीका केली. संसदेत केंद्र सरकारमधील एका मंत्र्यांने जम्मू-काश्मीरवर उत्तर देताना दहशतवादी दगडफेक करत असल्याचा दावा केला होता. मग गुजरातमध्ये राहुल गांधींवर दगडफेक करणारे कोण होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात पूर असताना काँग्रेस आमदार कुठे होते असा सवाल भाजपवाले विचारतात. मग राज्यात पूर असताना गुजरातचे मुख्यमंत्री कुठे होते असा प्रतिप्रश्न त्यांनी भाजपला केला. महात्मा गांधींनी अहिंसेचा संदेश दिला. भाजप सरकार नेमका काय संदेश देऊ इच्छिते?, महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांना तुम्ही प्रसिद्धी देता असा आरोप त्यांनी केला. खरगे यांच्या विधानवर भाजप खासदारांनी आक्षेप घेतला. यानंतर गदारोळ सुरु झाल्याने लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत राहुल गांधींच्या कारवरील दगडफेकीच्या घटनेवर स्पष्टीकरण दिले. राहुल गांधींना एसपीजी सुरक्षा आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी पोलीस बंदोबस्तही होता. मात्र राहुल गांधींनी पोलिसांनी दिलेल्या बुलेट प्रूफ कारऐवजी दुसऱ्या कारमध्ये बसण्याचा निर्णय घेतला असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. राहुल गांधींनी पोलिसांऐवजी त्यांच्या स्वीय सहाय्यकांचे ऐकले. त्यांनी या दौऱ्यात एसपीजीच्या शिष्टाचाराचे उल्लंघन केले. त्यांनी एसपीजीचे सुरक्षा कडे तोडून जनतेची भेट घेतली असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी गेल्या दोन वर्षात ७२ दिवस परदेशात होते. परदेश दौऱ्यातही त्यांनी एसपीजी सुरक्षा नाकारली याकडेही सिंह यांनी लक्ष वेधले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress rahul gandhi bjp party workers terrorist threw stones in gujarat says mallkarjun kharge rajnath singh lok sabha