काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट आणि जेईई परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि त्यांनी सहमती दर्शवल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा असा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करत उपाय शोधला पाहिजे असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. तुम्ही आधीच करायचं तेवढं नुकसान केलं आहे. आता तरी देशातील विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐका अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर करोना संकटाचा सामना कऱण्यात असमर्थ ठरल्याचा आरोप केला आहे. सरकारने आपला निर्णय विद्यार्थ्यांवर लादता कामा नये असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- नीट, जेईई परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका, महाराष्ट्रासह सहा राज्यांचं निर्णयाला आव्हान

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ‘स्पीक अप फॉर स्टुडंट सेफ्टी’ मोहिमेअंतर्गत एक व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हटलं आहे की, “प्रिय विद्यार्थी, तुम्ही या देशाचं भविष्य आहात आणि तुम्हीच भारताला नव्या उंचीवर नेऊ शकता. गेल्या तीन-चार महिन्यात काय झालं हे सर्वांनीच पाहिलं आहे. करोना संकट योग्यप्रकारे हाताळलं नाही असं प्रत्येकाला वाटत आहे. आर्थिक नुकसान झालं. लोकांना यातना सहन कराव्या लागल्या”.

आणखी वाचा- NEET, JEE : …त्यांच्या सहमतीनेच निर्णय घेतला जाणं महत्त्वाचं; सोनिया गांधी यांचा मोदींना सल्ला

“लोकांना अजून त्रास दिला पाहिजे असं मला वाटत नाही…तुम्ही काही चुकीचं केलं आहे असंही मला वाटत नाही. सरकार असमर्थ ठरल्याचं मला स्पष्ट दिसत आहे. सरकारने तुमच्यावर कोणतीही गोष्ट का लादावी ? सरकारने तुमचं ऐकलं पाहिजे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सरकारने कोणताही निर्णय चर्चा केल्यानंतरच घेतला पाहिजे असं मत राहुल गांधी यांनी मांडलं आहे.

आणखी वाचा- अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं आहे की, “भारत सरकारला मला सांगायचं आहे की, तुम्ही आधीच करायचं तेवढं नुकसान केलं आहे. आता तरी देशातील विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐका आणि मग शांततेत उपाय शोधा”. जेईई परीक्षा १-६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान जेईई-नीट परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम असून यादरम्यान बिगरभाजप सात राज्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.