करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात एकही ऑक्सिजनची कमतरता भासल्याने एकही मृत्यू न झाल्याच्या केंद्राच्या दाव्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला असून जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील ट्वीट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान राहुल गांधीच्या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते गिरीराज सिंग यांनी इटालियन भाषेत ट्वीट केलं आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी देशात एकाही मृत्यूची नोंद नाही : केंद्र सरकार

करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिनजची कमतरता भासू लागली होती. काही राज्यांमध्ये झालेल्या मृत्यूनंतर सुप्री कोर्टाने याची दखल घेतली होती. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभेत उत्तर देताना केंद्र सरकारने राज्यांकडून मिळालेल्या डेटावरुन ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचं सांगितलं.

ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या दाव्यावर संजय राऊत संतापले; म्हणाले…

यानंतर राहुल गांधी यांनी हिंदीमध्ये ट्वीट करत फक्त ऑक्सिजनची कमतरता नव्हती, तर तेव्हा आणि आत्ताही सत्यता आणि संवेदनशीलतेचीही कमतरता असल्याचं म्हटलं.

राहुल गांधी यांच्या या टीकेला भाजपा नेते गिरीराज सिंग यांनी इटालियन पोस्ट टाकत उत्तर दिलं. “मी या राजकुमाराबद्दल बोलेन: त्यावेळी त्याच्याकडे मेंदूची कमतरता होती, आत्ताही आहे आणि नंतरही राहील. या याद्या राज्यांनी संकलित केल्या आहेत. आपण आपल्या पक्षाचं सरकार असणाऱ्या राज्यांना सुधारित याद्या पाठवण्यास सांगू शकता. तोपर्यंत खोटं बोलणं थांबवा,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊतांची टीका

“ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मरण पावले, जे ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स घेऊन धावत होते, त्यांचा यावर विश्वास बसतो का हे सांगायला हवं. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे,” असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. “उत्तर लेखी असो किंवा मौखिक; सरकार सत्यापासून पळत आहे. बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.