उत्तराखंडमध्ये १९ वर्षीय अंकिता भंडारीच्या खूनानंतर राज्यासह संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. अंकिता भंडारीचा मृतदेह सापडल्यानंतर स्थानिकांनी ती ज्या ठिकाणी कामाला होती त्या ‘रिसॉर्ट’ला आग लावली. अंकिताच्या खुनाचा आरोप असलेल्या पुलकित आर्य याच्या मालकीचे हे ‘रिसॉर्ट’ आहे. भाजपाचे माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकितच्या मालकीचं हे रिसॉर्ट आहे. दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केलं आहे. केरळमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सभेत ते बोलत होते.

या घटनेतून ते महिलांना कशाप्रकारे एक वस्तू आणि दुय्यम नागरिक म्हणून वागणूक देतात हे समोर आलं असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. हीच भाजपाची खरी विचारसरणी असून, ते फक्त सत्तेचा आदर करतात असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

पुलकित आर्य याने आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अंकिता भंडारीचा खून केला. पाहुण्यांना ‘विशेष सेवा’ देण्यास नकार दिल्याने त्यांनी अंकिता भंडारीचा खून करुन हृषीकेश येथील नाल्यात मृतदेह टाकून दिला होता. तपासात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे हाती लागले आहेत.

उत्तराखंडमध्ये तरुणीच्या हत्येचे संतप्त पडसाद : ‘रिसॉर्ट’ला जमावाकडून आग; आरोपीचे वडील असलेल्या माजी मंत्र्याची भाजपमधून हकालपट्टी

“विचार करा, एक भाजपा नेत्याच्या मालकीचं हॉटेल आहे आणि त्याचा मुलगा तरुणीला देहविक्रीसाठी जबरदस्ती करत आहे. जेव्हा ती तरुणी विरोध करते, तेव्हा तिचा मृतदेह कालव्यात सापडतो,” असा संताप राहुल गांधींनी व्यक्त केला.

“भाजपा देशातील महिलांना कशाप्रकारे वागणूक देत आहे, याचं हे अत्यंत वाईट आणि लाजिरवाणं उदाहरण आहे. भाजपा आणि आरएसएसची विचारसरणी महिलांना एक वस्तू आणि दुय्यम नागरिक म्हणून पाहते. अशा विचारसरणीने भारत कधीच जिंकू शकत नाही. जो देश आपल्या महिलांचा आदर करत नाही किंवा त्यांचं सक्षमीकरण करत नाही, तो काहीच मिळवू शकत नाही. जो देश आपल्या महिलांना दुय्यम नागरिक म्हणून पाहतो, तो अपयशीच होतो,” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केलं. “मुलगी वाचवा अशी मोदींची घोषणा आहे आणि बलात्काऱ्यांना वाचवा असं भाजपाचं कर्म आहे. हे पहिले पंतप्रधान असतील ज्यांचा वारसा फक्त खोटी भाषणं असतील. गुन्हेगारांसाठी त्यांनी सत्ता समर्पित केली आहे. पण आता भारत शांत बसणार नाही,” असा इशारा राहुल गांधींनी दिला.