राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये जेवण करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी नवरात्रीच्या काळात तेजस्वी यादव यांनी मासे खाल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. तेजस्वी यादव यांच्या त्या व्हिडिओमुळे राजकीय वादळ उठवलं होतं. आता लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. सातवा टप्पा अद्याप बाकी आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राहुल गांधी, तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीच्या काही नेत्यांनी एकत्र जेवण करत निवडणुकीसंदर्भात आणि प्रचारादरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडीसंदर्भात चर्चा केली आहे.

तेजस्वी यादव यांनी एक्स अकाउंटवर (ट्विटर) हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते चर्चा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिश्किल टिप्पणी करताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये तेजस्वी यादव यांनी म्हटलं की, “अहो साहनी जी, नरेंद्र मोदीजींच्या घशात माशाचा काटा अडकला”, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. तर ते पुढे म्हणताना दिसत आहेत की, “राहुल गांधी यांनी आत्तापर्यंत दोनदा मटण खाल्लेले आहे”, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.

हेही वाचा : “४ जूननंतर नितीश कुमार पुन्हा…”, तेजस्वी यादव यांच्या दाव्यामुळे बिहारच्या राजकारणात ट्विस्ट

दरम्यान, यावेळी प्रत्येकजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान केलेल्या विधानावर चर्चा करताना दिसत आहेत. तेजस्वी यादव म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये एका सभेला आले होते. मात्र, काहीही बोलले नाहीत. ते फक्त खोटं बोलले’. यावर राहुल गांधी यांनी म्हटलं, “ते न थांबता, कोणताही संकोच न करता खोटं बोलतात. ते काहीही बोलू शकतात”, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

तेजस्वी यादव यांनी काय दावा केला होता?

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला होता. ते म्हणाले होते, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आता ४ जूनच्या निकालानंतर पुन्हा एकदा आपली भूमिका बदलतील. ४ जूननंतर नितीश कुमार इंडिया आघाडीत परततील, असे भाकीत तेजस्वी यादव यांनी वर्तविले होते. त्यांच्या या दाव्यामुळे बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये इंडिया आघाडीच्या जास्त निवडणून येतील, असाही विश्वास व्यक्त केला आहे.