पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ दौऱ्यादरम्यान होशंगाबाद रोडवर त्यांच्या स्वागतासाठी फलक घेऊन उभ्या असलेल्या बुरखाधारी महिलांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काँग्रेसने त्या महिलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्या मुस्लिम नसून दुसऱ्या समाजाच्या असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या भोपाळ दौऱ्यात बरकतुल्ला विद्यापीठ ते राणी कमलापती रेल्वे स्टेशनपर्यंत या रस्त्याने प्रवास केला होता.

सुमारे अडीच किलोमीटरच्या मार्गात अनेक ठिकाणी त्यांच्या ताफ्याचे स्वागत करण्यात आले. एके ठिकाणी त्यांच्या ताफ्यावर इतक्या झेंडूच्या फुलांचा वर्षाव करण्यात आला की मोदींची बुलेटप्रूफ गाडी पूर्णपणे झाकली गेली होती. वाटेत माजी महापौर आलोक शर्मा मोठ्या संख्येने बुरखा परिधान केलेल्या महिलांसह पोहोचले होते आणि त्यांच्यामार्फत मोदींचे स्वागत केले होते. या महिलांच्या हातात तिहेरी तलाक रद्द केल्याबद्दल आभाराचे फलक होते.

महिला मुस्लिम नसल्याचा काँग्रेसचा दावा

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी ट्विटरवर या संदर्भात एक एक फोटो टाकला आहे. या फोटोत एका महिलेच्या हातात कलावा (हिंदू धर्मात हातात बांधण्यात येणारा धागा) बांधलेला दिसत आहे. या फोटोच्या माध्यमातून देशभरात खूप प्रसिद्धी झाली. पण या फोटोचे वास्तव काही वेगळेच आहे, असे सलुजा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे राणी कमलापती रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवली. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, नाव बदलल्यामुळे स्थानकाचे महत्त्व वाढले आहे. या स्टेशनचे नाव आधी हबीबगंज रेल्वे स्टेशन होते, ते आता राणी कमलापती असे बदलले आहे. हे स्थानक जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आहे. या स्थानकात नागरिकांना विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहेत.

“भोपाळच्या या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण तर झालेच पण गिन्नौरगडच्या राणी कमलापतीचे नाव जोडल्याने त्याचे महत्त्वही वाढले आहे. आज भारतीय रेल्वेचा अभिमान गोंडवानाच्या अभिमानाशी जोडला गेला आहे. भारत कसा बदलत आहे, स्वप्ने कशी साकार होऊ शकतात हे पाहायचे असेल, तर आज भारतीय रेल्वे देखील याचे उत्तम उदाहरण बनत आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.