ऑगस्टावेस्टलँड मुद्दय़ावर संसदेत सरकार आक्रमक झालेले असतानाच, काँग्रेसने शुक्रवारी राजधानीत ‘लोकशाही बचाव’ रॅलीच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकार हे लोकशाहीचा ‘खून’ करत असून विरोधी पक्षांविरुद्ध ‘निराधार आरोपांची’ मोहीम राबवत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी आवेशपूर्ण भाषणात केला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रस्त्यांवर उतरून संसदेजवळ काही वेळासाठी स्वत:ला अटक करवून घेतली.

हे सरकार ज्या रीतीने काम करत आहे, ते पाहता या सरकारचे ‘दिवस भरले’ असल्याचे भाकीत सोनिया गांधींनी केले. त्यांच्यासह आंदोलन करणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

काँग्रेस पक्ष संसदेत तसेच संसदेबाहेर ‘संपूर्ण ताकदीने’ सजग विरोधी पक्षाची भूमिका पार पाडेल, असे सांगून सोनिया यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मोदी सरकारचा ‘बुरखा’ उतरवण्याचे आवाहन केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे व इतर लोक संसदेकडे निघाले असताना त्यांना अडवण्यात आल्यानंतर त्यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात स्वत:ला अटक करवून घेतली. थोडय़ा वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. जेव्हा गोष्टी सहन करण्यापलीकडे जातात, त्या वेळी धडा कसा शिकवायचा हे भारताच्या लोकांना माहीत आहे. ज्या रीतीने मोदी सरकार जनमताचा अनादर करत आहे, त्यावरून त्यांचे दिवस भरले असल्याचे वाटते, असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाल्या. अरुणाचल प्रदेश व उत्तराखंडमधील काँग्रेस सरकारे पाडल्याबद्दल राहुल गांधी व मनमोहन सिंग यांनी या वेळी मोदी सरकावर हल्ला चढवला.

सोनिया ‘शेरनी’!

सोनिया गांधी या ‘शेरनी’ असून, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात त्यांना लक्ष्य केल्याबद्दल तुमच्यावर पश्चात्तापाची पाळी येईल, असा इशारा काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेत मोदी सरकारला दिला. गेल्या दोन वर्षांत तपासात काहीच प्रगती का नाही? संसदीय समितीमार्फत तपासाला तुम्ही विरोध का केला, असेही शिंदे यांनी विचारले.