scorecardresearch

कर्नाटक विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी तयार; पण माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसाठी मतदारसंघच निश्चित नाही

कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविला आहे. वरुणा विधानसभा मतदारसंघ मुलगा यथिंद्राला मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे.

Karnataka Congress Siddaramaiah and DK Shivakumar
काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी पहिली यादी तयार केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ९० उमेदवारांची पहिली यादी तयार केली असून २२ मार्च रोजी ‘उगडी’ सणानिमित्त पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समिती आणि पडताळणी समितीसोबत बैठक घेतल्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस नेते दिल्लीहून शनिवारी (दि. १८ मार्च) राज्यात परतले. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या इच्छूक असलेल्या दक्षिण कर्नाटकातील कोलार विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असे या बैठकीनंतर दिसत आहे. काँग्रेस पक्षाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधीमंडळ पक्षनेते सिद्धरामय्या आणि पक्षाचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी हे दिल्लीतील बैठकीहून परतल्यानंतर म्हणाले की, ज्या जागांवर उमेदवारीवरून कोणताही वाद नाही, अशाच मतदारसंघाची आधी घोषणा होईल.

शिवकुमार यांनी सांगितले की, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे २० मार्च रोजी युवकांची जाहीर सभा घेण्यासाठी कर्नाटकात येणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी आम्ही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू. तर सिद्धरामय्या म्हणाले की, ज्याठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छूक नाहीत. ज्याठिकाणी उमेदवारांची निश्चिती झालेली आहे. मग त्याठिकाणी काँग्रेसचा विद्यमान आमदार असो या नसो, अशाच मतदारसंघातील उमेदवारांची सर्वातआधी घोषणा केली जाईल. तर जारकीहोळी म्हणाले की, आम्ही जवळपास १२० उमेदवारांची यादी अंतिम केली आहे. मात्र त्यापैकी फक्त ९० जणांची आधी घोषणा होईल. त्यानंतर उरलेल्या २० ते ३० जागांचा आणखी आढावा घेतला जाणार आहे.

हे वाचा >> कर्नाटक निवडणुकीत पुन्हा त्रिशंकू परिस्थिती? काँग्रेस आणि भाजपाची कुमारस्वामींवर नजर

यासोबतच विद्यमान सहा आमदारांच्या निवडणूक लढविण्याबाबत असलेल्या मतभेदाबाबत बोलताना जारकीहोळी म्हणाले की, पक्षाने मतदारसंघाचा सर्व्हे करून, नेत्यांचे मत विचारात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. तर शिवकुमार यांनी जारकीहोळी यांचे मत फेटाळून लावले. ते म्हणाले की, कोणत्याही विद्यमान आमदाराचे तिकीट कापले जाणार नाही. दोन आमदारांनी स्वतःहून निवडणूक न लढण्याचा निर्णय कळवला आहे. एका आमदारांने स्वतः निवडणूक न लढवता दुसऱ्या उमेदवाराचा पर्याय सूचविला आहे. आमचे सर्व आमदार मेहनत घेत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या विद्यमान आमदारांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत.

असे असले तरी सिद्धरामय्या यांच्यासाठी पक्षश्रेष्ठी आणि राहुल गांधी यांची सूचना चिंतेचा विषय ठरत आहे. सिद्धरामय्या यांना रस असलेली कोलार विधानसभा त्यांनी लढवू नये, अशी पक्षाची इच्छा आहे. मात्र यावर पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सिद्धरामय्या यांनी दिलेल्या संकेतानुसार त्यांना ही विधानसभा मिळवणे अडचणीचे ठरू शकते. याबाबत विचारले असता सिद्धरामय्या म्हणाले की, कोलारच्या जागेबाबत पक्षश्रेष्ठी आणि राहुल गांधी निर्णय घेतील. हा निर्णय मी सर्वस्वी त्यांच्यावर सोडला आहे. त्यांनी माझे नाव अद्याप अंतिम केलेले नाही. जर पक्षाने सांगितले की, मी बदामी येथून लढावे, तर मी बदामीमधून निवडणूक लढेल. ते म्हणाले वरूणा इथून लढ, तर मी तिथूनही लढायला तयार आहे आणि जर का त्यांनी कोलार सांगितले तर मग कोलारही चालेल. मला वाटते, ते मला एकाचवेळी दोन मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तर नक्कीच सांगणार नाहीत.

यासोबतच सिद्धरामय्या यांनी हेदेखील अधोरेखित केले की, त्यांचा मुलगा यथिंद्रा याला वरूणाची जागा मिळायला कोणतीही अडचण येणार नाही. २०१८ पासून सिद्धरामय्या यांच्या कुटुंबाचा या मतदारसंघावर वरचष्मा राहिला आहे. सिद्धरामय्या म्हणाले, वरूणामध्ये केवळ एकच उमेदवार आहे, तो म्हणजे यथिंद्रा.

हे वाचा >> कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरली, विजयासाठी राबवणार गुजरात, उत्तर प्रदेशचे खास मॉडेल!

२०१८ साली, मुख्यमंत्री असलेल्या सिद्धरामय्या यांनी म्हैसूर क्षेत्रातील चामुंडेश्वरी आणि बागलकोटच्या बदामी येथून निवडणूक लढवली होती. तर कुटुंबाचा हक्काचा असलेला मतदारसंघ मुलगा यथिंद्रासाठी त्यांनी सोडला. यापैकी चामुंडेश्वरी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला तर बदामी येथून त्यांनी अतिशय कमी फरकाने विजय मिळवला. यथिंद्रा यांनीही वरूणा येथून विजय मिळवला. सिद्धरामय्या यांनी यापूर्वीच कोलारमधून निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखविले होते. मात्र तीन दशकांपासून काँग्रेसने याठिकाणी विजय मिळवलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेतृत्वाला वाटते की, माजी मुख्यंमत्र्यांसाठी हा मतदारसंघ सुरक्षित नाही.

सिद्धरामय्या यांच्या कोलारमधील इच्छेबाबत शिवकुमार यांना विचारले असता ते म्हणाले की, कोलारबाबतचा निर्णय सिद्धरामय्या यांनी स्वतः घ्यायचा आहे. तर जारकीहोळी म्हणाले की, हा विषय सिद्धरामय्या आणि पक्षश्रेष्ठी यांच्यामधला आहे. पक्षाने बेळगावीमधील सौंदत्ती मतदारसंघ सिद्धरामय्या यांना देऊ केला आहे. तसेच दक्षिण कर्नाटकातील काही जागा आहेत, जिथे त्यांना निवडणूक लढणे सोपे जाईल. जसे की त्यांना म्हैसूर किंवा कोलार चालू शकेल.

आणखी वाचा >> काँग्रेसचे नेते सिद्धरामय्यांनी पंतप्रधान मोदींची केली हिटलरशी तुलना; म्हणाले, “काही दिवसच…”

दरम्यान, सिद्धरामय्या यांना काँग्रेसने मतदारसंघ देण्यावरून ताटकळत ठेवल्याबद्दल भाजपा आणि जेडी(एस) ने त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. भाजपाचे नेते, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा म्हणाले की, मी आधीपासून सांगत होतो की, सिद्धरामय्या हे कोलारमधून निवडणूक लढविणार असल्याचे फक्त चित्र निर्माण करत आहेत. मी सांगितल्याप्रमाणे ते शेवटी वरूणा विधानसभेतच निवडणूक लढवतील. मी जे बोलत होतो, ते सत्यात उतरताना दिसत आहे. तर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणाले की, यावरून असे दिसते की माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कुठेही मतदारसंघ मिळत नाही. बदामी त्यांच्यासाठी सुरक्षित नाही, चामुंडेश्वरी आणि कोलार देखील त्यांच्यासाठी सुरक्षित नाही.

जेडी (एस)चे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम म्हणाले की, सिद्धरामय्या यांच्यासारखे नेते हे सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी सभागृहात असणे गरजेचे आहे. ते अनुभवी नेते आहेत. त्यामुळे त्यांना कुठून निवडणूक लढवायची आहे, हे त्यांनाच ठरवू दिली पाहीजे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 18:21 IST