कथित चित्रफितीने वाद; हरीश रावत यांनी आरोप फेटाळले
उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी केला असून या प्रकाराचे स्टिंग केलेली व्हिडीओ फीत जारी केल्याने खळबळ माजली आहे. रावत यांनी मात्र ही फीत बनावट असल्याचे सांगून घोडेबाजार करीत असल्याच्या आरोपांचेही जोरदार खंडन केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे घाणेरडे राजकारण सुरू झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे, तर रावत सरकार तातडीने बरखास्त करण्याची मागणी भाजपने केली आहे.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी ही व्हिडीओ फीत दिल्लीत जारी केली, या सीडीमधील घटनांवरून रावत हे नऊ आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सिद्ध होते, त्यामुळे रावत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असे बहुगुणा म्हणाले.
वृत्तवाहिन्यांवरून दाखविण्यात येणारी स्टिंग सीडी बनावट आहे, यामागे हात असलेली व्यक्ती खासगी वृत्तवाहिनीशी संबंधित असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही, त्यामुळे या प्रकाराची चौकशी झालीच पाहिजे, असे रावत यांनी आपल्या निवासस्थानी तातडीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सदर सीडी बनावट असल्याचा दावा रावत यांनी केला, या सीडीवरून स्पष्ट होते की बंडखोर आमदारांनी पैशांसाठी भाजपशी संधान बांधले हे सूचित होते, असेही रावत म्हणाले. अशा प्रकारच्या क्लृप्त्या, कारस्थान आणि दबावासमोर काँग्रेस झुकणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. उत्तराखंड सरकारकडे आताही बहुमत आहे, आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करू, असेही ते म्हणाले.
स्टिंग व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय म्हणाले की, रावत यांना क्षणभरही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.