Congress rejects TMC merger rumours : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडाळी उफाळून आली असून विधानसेभेचे ६० आमदार पक्षापासून विलग झाले आहेत. लोकसभेतील २० खासदारांनी सत्ताधारी एनडीए सरकारला साथ दिली असून राज्यसभेच्या खासदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत त्या काँग्रेसची मदत घेणार असून काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी रंगली होती. या चर्चांवर आता खुद्द काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसने गुरुवारी तृणमूल काँग्रेससोबत संभाव्य विलीनीकरणाची चर्चा फेटाळून लावत हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीत केवळ राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. “df gbcया केवळ अफवा आहेत. टीएमसी आणि काँग्रेस नेत्यांमधील बैठक केवळ राष्ट्रीय मुद्दे अधिक प्रभावीपणे मांडण्यावर चर्चा करण्यासाठी होती,” असे ते म्हणाले.

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर चर्चांना उधाण

सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या बैठकीला पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी उपस्थित राहिल्यानंतर दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला होता. यानंतर दोघांनी काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी स्वतंत्र भेट घेतली. ममता बॅनर्जी यापूर्वी इंडिया आघाडीच्या बैठकींना निवडकपणे उपस्थित राहिल्या आहेत. अनेकदा त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना पाठवले होते. जून २०२३ मधील पाटणा येथील पहिली बैठक आणि त्यानंतर दिल्लीतील अनेक बैठकींना त्या अनुपस्थित होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच टीएमसीच्या विधिमंडळ आणि संसदीय गोटात फूट पडल्याचे समोर आले आहे. २९४ सदस्यांच्या विधानसभेत पक्षाला केवळ ८० जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

टीएमसीकडून विलीनीकरणाच्या वृत्ताचं खंडन

तृणमूल काँग्रेसने विलीनीकरणाच्या शक्यतेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय मानले जाणारे टीएमसी खासदार सौगत रॉय म्हणाले की, पक्षाने काँग्रेससोबत काम करणे महत्त्वाचे आहे. परंतु हे सहकार्य आघाडीच्या स्वरूपात असेल की विलीनीकरणाच्या, हे निश्चित नाही. पश्चिम बंगालमधील ८० पैकी ६४ टीएमसी आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणारे ऋतब्रत बॅनर्जी यांनीही काँग्रेससोबतच्या विलीनीकरणाचे वृत्त फेटाळले आहे. “विलीनीकरणाबाबत सांगायचे तर, आमचा विधिमंडळ पक्ष काँग्रेसमध्ये सामील होत नाही आहे. संसदेतील दोन-तृतीयांशपेक्षा जास्त खासदारही काँग्रेसमध्ये विलीन होत नाहीत. मग कोण कोणामध्ये विलीन होत आहे?” असा सवाल त्यांनी केला.

ममता बॅनर्जींची प्रदीर्घ काँग्रेस कारकीर्द

पश्चिम बंगालच्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या ममता बॅनर्जी यांनी १९९७ मध्ये राज्यातील नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर काँग्रेस सोडली होती. त्यापूर्वी त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये घालवला होता. काँग्रेस हाय कमांडने पश्चिम बंगालकडे दुर्लक्ष केल्याची त्यांची टीका होती. सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या सरकारला आव्हान देण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही, असं त्यांचं मानणं होतं.१९९८ मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. हा पक्ष राज्यातील मुख्य विरोधी पक्ष म्हणून उदयास आला आणि २०११ च्या ऐतिहासिक विधानसभा निवडणुकीत त्यांनी डाव्या आघाडीची सत्ता उलथवून लावली.

सध्या काँग्रेस आणि टीएमसी दोघांनीही विलीनीकरणाची चर्चा फेटाळली आहे. मात्र, अंतर्गत कलह आणि निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी आपले राजकीय भवितव्य सुधारण्यासाठी काँग्रेससोबत नव्या समीकरणांचा विचार करणार का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.