गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या मुद्दय़ावर राज्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारास काँग्रेसच जबाबदार आहे, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केला असून जाळपोळ व गुंडगिरी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. दरम्यान आसाम राज्यात हिंसाचार सुरूच असून अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील हिंसाचार हा राजकीय कटाचा भाग असून राज्यातील मूळ अधिवासी लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यास आपण वचनबद्ध आहोत, असे सांगून ते म्हणाले,की काँग्रेस व काही जातीयवादी शक्ती हिंसाचारास कारणीभूत आहेत. काही डावे अतिरेकी जमावात सामील आहेत. सरकार हिंसाचार सहन करणार नाही, जे गुंडगिरी करतील त्यांच्यावर कारवाई  करण्यात येईल.

संतप्त जमावाने आसाममध्ये काही ठिकाणी टायर जाळले. प्रवाशांच्या गाडय़ांवर हल्ले  केले. दोन रेल्वे स्टेशन पेटवण्यात आली. काही आमदारांची घरे, सोनोवाल यांचे खासगी निवासस्थान यावर हल्ले करण्यात आले. आसाममधून येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. आसाममधील लोकांच्या घटनात्मक सुरक्षेची काळजी घेऊन शिफारशी करण्यासाठी निवृत्त न्या. बिप्लब सरमा यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे.