एक्स्प्रेस वृत्त, नवी दिल्ली

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ बुधवारपासून कन्याकुमारी येथून सुरू होत आहे. ३,५७० किलोमीटरच्या या यात्रेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी सज्ज झाले आहेत. काँग्रेस पक्षाने या पदयात्रेचे वर्णन आजपर्यंतचा सर्वात मोठा जनसंपर्क कार्यक्रम असा केला आहे.

महागाई, बेरोजगारी तसेच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकारणाच्या केंद्रीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तीव्र झालेल्या प्रश्नांकडे केंद्रातील सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. केंद्र सरकारविरोधात देशातील जनतेने संघटित होणे हे या पदयात्रेचे उद्दिष्ट आहे. वाढती बेरोजगारी, वाढत्या किमती आणि वाढती असमानता या समस्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहेच, पण केंद्र सरकारमुळे निर्माण झालेले भय, धर्माधता आणि पूर्वग्रहदूषित राजकारणाविरोधात देश आणि सर्वसामान्य नागरिकांना एकत्र येण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

या पदयात्रेला प्रांरभ करण्यापूर्वी राहुल गांधी त्यांचे पिता आणि माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या श्रीपेरूंबदुर येथील स्मृतीस्थळी जाऊन प्रार्थनासभेत भाग घेतील. त्यानंतर कन्याकुमारी येथील कार्यक्रमात राहुल सहभागी होतील. तिथे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित असतील. या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या हाती खादीचा राष्ट्रध्वज देण्यात येईल आणि त्यानंतर पदयात्रेला प्रारंभ करण्यात येईल.

३,५७० किलोमीटरची ही पदयात्रा कन्याकुमारीपासून काश्मीपर्यंत असेल.