काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनितालमधील घरावर हल्ला करुन तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. सलमान खुर्शीद यांनी आपलं पुस्तक ‘Sunrise Over Ayodhya’ मध्ये हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यानंतर सलमान खुर्शीद यांनी प्रतिक्रिया दिली असून हा हिंदुत्ववाद नसल्याचं म्हटलं आहे. यादरम्यान त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्ला मुलाखतीत हल्ल्यावरुन नाराजी जाहीर केली असून हिंदुत्व काय करायचं पहायचं असेल तर, माझ्या घराचा जळालेला पाहा असं सांगितलं आहे.

पुस्तकातील उल्लेख चुकीचा वाटतोय का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “अजिबात नाही, अन्यथा मी पत्रकार परिषद बोलावली असती. जे असहमत आहेत त्यांनीदेखील स्पष्ट सांगितलेलं नाही. माझं नैनितालमधील घर जाळण्यापर्यंत ते पोहोचले आहेत. यावरुनच मी काय सांगत आहे ते सिद्ध होत नाही का? त्यांचं हिंदुत्व विरोधाभास निर्माण करणारं आहे. त्यांनी जे केलं आहे त्यावरुन माझं वक्तव्य योग्य असल्याचं सिद्ध झालं आहे. फक्त फोन किंवा सोशल मीडियावरुन शाब्दिकदृष्ट्या नाही तर थेट घरावर हल्ला करण्यात आला आहे”.

राजकीय हिंदुत्वाची तुलना दहशतवादाशी करणं योग्य आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “मी साधर्म्य असल्याचं म्हटलं आहे. एकसारखे किंवा समान असल्याचं म्हटलेलं नाही. यामध्ये काही विशेषता असून धर्माचा होणारा गैरवापर मुख्य मुद्दा आहे. जिहादींबद्दल बोलायचं गेल्यास जर इस्लाम माझा धर्म असेल तर मग त्याचा गैरवापर करणाऱ्यांबद्दल मला बोलण्यापासून का रोखलं जातं? सर्व धर्मांना एकत्र आणणे हाच माझा हेतू असून अयोध्या निकालाला पाठिंबा दर्शवत मी तेच करण्याचा प्रयत्न केला होता”.

गुलाम नबी आझाद यांनीदेखील तुमच्या वक्तव्याचा निषेध केला असून अतिशयोक्तीपूर्ण असल्याचं म्हटलं आहे असं विचारण्यात आलं असता खुर्शीद म्हणाले की, “धन्यवाद…याचा अर्थ गुलाम नबी आझाद माझे नेते आहेत, राहुल गांधी नाहीत? बरोबर ना? गुलाम नबी आझाद मोठे आणि आदरणीय नेते आहेत. जर ते अतिशयोक्ती असल्याचं म्हणत असतील तर असावी असं मी समजतो. पण जर तुम्हाला हिंदुत्व काय करतं हे पहायचं असेल तर माझ्या घऱाचा जळलेला दरवाजा पाहा”.